
पुण्यात पर्यटनासाठी वेगवेगळ्या जागी फिरताना एक वेगळीच जागा आपल्याला बघायला मिळेल, ती म्हणजे सर्पोद्यान.
Snake Park : पुणे परिसर दर्शन : राजीव गांधी प्राणिसंग्रहालय कात्रज
पुण्यात पर्यटनासाठी वेगवेगळ्या जागी फिरताना एक वेगळीच जागा आपल्याला बघायला मिळेल, ती म्हणजे सर्पोद्यान. १९८६ मध्ये पुणे महापालिकेने सर्पमित्र नीलमकुमार खैरे यांच्या पुढाकाराने कात्रजजवळ सर्पोद्यान तयार केले. सह्याद्रीत सापडणाऱ्या अनेक जातीच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे जतन आणि संवर्धनाची अत्याधुनिक व्यवस्था येथे आहे. त्याआधी खैरेंनी सापांबद्दल लोकांमध्ये पसरलेले गैरसमज दूर केले. त्यासाठी त्यांनी सापांबरोबर एकाच पिंजऱ्यात राहून वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले.
वेगवेगळ्या जातीचे साप आणि त्याचबरोबरच सरपटणारे इतर प्राणी जसे की सुसर, मगर, कासव असे सर्व प्राणी या ठिकाणी आहेत. विशेष म्हणजे साप आणि सर्पप्रेमी यांच्यात कुठलाही अडसर नाही. त्याचबरोबर सापाबद्दलचे माहिती फलकही लावलेली आहेत, त्यामुळे सापांबद्दल असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होते. येथे नाग, घोणस, फुरसे, दिवड, पाणसाप, कासव, मगर, सुसर, वेगवेगळ्या प्रकारचे अजगर बघायला मिळतात. १९९६ मध्ये या सर्पोद्यानाच्या पुढेच कात्रज तलावाच्या दोन्ही बाजूंनी महापालिकेने प्राणी संग्रहालय तयार करायचा निर्णय घेतला.
आधीपासून हे संग्रहालय सारसबागेजवळच पेशवे उद्यानात होते. १७५० मध्ये नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा सारसबाग तयार केली, त्याचवेळी पेशव्यांचे खासगी प्राणिसंग्रहालयसुद्धा तयार केले होते, तिथेच नंतर महापालिकेने १९५२ मध्ये प्राणी संग्रहालय चालू केले. हे प्राणी संग्रहालय पूर्वीच्या संग्रहालयाच्या पद्धतीने पिंजऱ्यामध्ये प्राणी ठेवून केलेले होते. सर्पोद्यानाच्या जवळच्याच १३० एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात अद्ययावत संग्रहालय तयार करायचा निर्णय घेतला आणि हे अभिनव प्रकारचे प्राणी संग्रहालय आपल्याला बघायला मिळते आहे. येथे अनेक स्थानिक वनस्पती आहेत.
काही माशांच्या प्रजाती आणि माशांची शिकार करून राहणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती नैसर्गिकपणे येथे मुक्कामी असतात. तसेच इतर पक्ष्यांमध्ये गरुड, ससाणा, घार, जंगली कोंबडी पाहायला मिळतात. शिकारी प्राण्यांमध्ये सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे आहेत. तसेच चौशिंगा, चितळ, हरिण, ठिपके असलेले हरिण, अस्वल, नीलगाय, आशियाई हत्ती, गवा, चिंकारा असे प्राणी बघायला मिळतात. संग्रहालयात इलेक्ट्रिक वाहनाची सोय आहे.
काय पहाल?
विविध विषारी, बिनविषारी सरपटणारे प्राणी, पक्षी आणि अनेक जंगली प्राणी.
कसे पोहचाल
कात्रजच्या अलीकडे राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आहे.
तेथे बसने किंवा खासगी वाहनाने जाता येते.
वेळ : सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३०
प्रवेश शुल्क : लहान मुलांना १० रुपये, मोठ्यांना ४० रुपये.
- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक