
उन्हाळ्यात जांभळं, करवंद खायला आणि काजवे बघायला, पावसाळ्यात चिंब भिजायला, थंडीत मस्त अल्हाददायक हवेत भटकायला पुण्याजवळच्या महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये एक म्हणजे विसापूर किल्ला.
Visapur Fort : पुणे परिसर दर्शन : विसापूर किल्ला
उन्हाळ्यात जांभळं, करवंद खायला आणि काजवे बघायला, पावसाळ्यात चिंब भिजायला, थंडीत मस्त अल्हाददायक हवेत भटकायला पुण्याजवळच्या महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये एक म्हणजे विसापूर किल्ला. भाजे लेण्यांच्या पासून पायवाट वर चढते. पहिला चढ चढला की, एक सपाटी लागते, तिथून विसापूर किल्ला उजवीकडे ठेवून पायवाटेने गेल्यावर ६०-७० खड्या पायऱ्या चढाव्या लागतात. गडावर गेल्यावर कळते की, गडाचा पसारा फार मोठा आहे आणि सर्व बाजूंनी मजबूत तटांनी वेढलेला आहे.
गडावर एक भव्य मारुतीचे शिल्प आणि मोठा चुन्याचा घाणा आहे. तटावरून फिरायला मजा येते; पण फारच मोठा फेरा पडतो. जिथून वर येतो त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूने अजून एक वाट आहे तिथे नाळेमध्ये तटबंदीची पडझड झाल्यामुळे दगड धोंड्यातून उतरावे लागते. त्या वाटेच्या सुरवातीला एक गुहेसारखे पाण्याचे टाके आहे. या दुसऱ्या वाटेवर अर्ध्यावर गेल्यानंतर एक छोटे पाण्याचे टाके खडकात खोदलेले आहे आणि त्यावर एक ब्राम्ही शिलालेख आहे. या वाटेने उतरून उजव्या बाजूला जाणारा रस्ता लोहगड आणि विसापूर यांच्या मधल्या खिंडीत जातो. समोरचा लोहगड जरी बराच आधी बांधलेला असला तरी विसापूरचा इतिहास फारसा पुरातन नाही. पेशवे काळात हा बांधला असावा, नंतर लोहगड जिंकण्यासाठी १८१८ मध्ये इंग्रजांनी याचा उपयोग केला.
लोकलने मळवलीला जाऊन एकदम कमी खर्चात मस्त भटकंतीचे समाधान हा किल्ला देतो. मात्र पावसाळ्यात ढगांमुळे वाट चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे वाटाड्या घेणे योग्य ठरेल. भाजे गावात वाजवी खर्चात वाटाड्या ठरवून घ्यावा.
काय पहाल?
पुण्याहून लोणावळा लोकलने मळवलीला उतरावे आणि तिथून चालत किंवा रिक्षाने भाजे गावात जाऊन किंवा स्वतःच्या वाहनाने भाजे गावात जाऊन तिथून पायपीट करत गडावर जाणे. भाजे गावात नाश्ता आणि जेवणाची सोय होते.
कसे पोहचाल
विसापूर किल्ल्यावर गेल्यावर वाटेवर मारुतीची मूर्ती आणि त्याच्या जवळची गुहा, गडाची मजबूत तटबंदी, दोन पक्क्या भिंतीच्या पण छत नसलेल्या इमारती, गडावरही मारुतीची मूर्ती, पाण्याची टाकी, भले मोठे जाते आणि चुन्याचा घाणा.
- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक