बीआरटी सक्षमीकरणासाठी आराखडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बीआरटी' सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याच्या अंमलबजावणीवर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

पुणे - सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बीआरटी' सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून त्याच्या अंमलबजावणीवर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

सातारा रस्त्यावर बीआरटी सेवा खंडित झाली असून, रस्ता पुनर्रचनेचे काम सुरू आहे, तर निगडी-दापोडी बीआरटी मार्ग प्रस्तावित आहे. नगर रस्ता आणि विश्रांतवाडी "कॉरिडॉर'मध्ये बीआरटी सेवा सुरू आहे; मात्र बीआरटी मार्गावरील थांब्यांवर स्वयंचलित दरवाजे उघडत नाहीत. आयटीएमएस यंत्रणा कोलमडली आहे. थांब्यांची दुरवस्था झाली आहे, आदी बाबी उघडकीस आल्या आहेत. त्यातच भाडेतत्त्वावरील कंत्राटदारांच्या बसची संख्याही 200 ने कमी झाली आहे. त्यामुळेही बीआरटी मार्गावरील प्रवासी संख्येवर विपरीत परिणाम झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीचे अध्यक्ष, महापालिकेचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांनी विश्रांतवाडी आणि नगर रस्ता बीआरटी मार्गांची पाहणी केली. आता पुढच्या टप्प्यात सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर यांनी दिली. 

बीआरटीमध्ये सुधारणा करण्यासाठी वाहतूक नियंत्रक दिवे, बीआरटी कॉरिडॉरमधील पायाभूत सुविधा, बसथांबे, तेथील डिस्प्ले बोर्ड, "आयटीएमएस' यंत्रणा यामध्ये कोणकोणत्या सुधारणा गरजेच्या आहेत, याचा आराखडा पीएमपी प्रशासनाने तयार केला आहे. महापालिकेच्या मदतीने त्याबाबत सुधारणा करण्यास सुरवात केली आहे. याबाबतचे काम लवकरच पूर्ण होईल, असे चारठाणकर यांनी स्पष्ट केले. नेहमीच्या मार्गावरील बसथांब्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. बीआरटी मार्गांच्या बसथांब्यांवरील स्वयंचलित दरवाजे सध्या बंद आहेत. त्यासाठी "पॉवर बॅकअप' लागणार आहे. महापालिका त्याबाबतची कार्यवाही करीत आहे. संगणकीकृत मध्यवर्ती नियंत्रण कक्षालाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

बीआरटी सेलचे लवकरच कार्यान्वयन 
बीआरटी मार्गांसाठी पीएमपीचा यापूर्वी स्वतंत्र बीआरटी सेल होता. सुरवातीला मयूरा शिंदेकर, नंतर सुषमा कोल्हे यांच्याकडे त्याचा पदभार होता. त्यानंतर पीएमपीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदावर राज्य सरकारने नियुक्ती केली नाही. त्यामुळे हा सेल मधल्या काळात बंद पडला होता. आता तो पुन्हा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार झाला आहे. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर हा सेल कार्यान्वित होणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले. या सेलमुळे बीआरटी मार्गांवर दैनंदिन लक्ष ठेवणे आणि विस्तारीकरणाच्या प्रकल्पांना गती देणे शक्‍य होणार असल्याचे चारठाणकर यांनी नमूद केले.

Web Title: Plan for BRT Empowerment