मुठा उजवा कालव्याचे अंतर कमी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

plan to carry water from the tunnel between Khadakwasla Dam and Fursungi pune

मुठा उजवा कालव्याचे अंतर कमी होणार

पुणे : खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यामधून पाणी नेण्याच्या योजनेमुळे सध्या असलेले कालव्याचे अंतर दहा किलोमीटरने कमी होणार आहे. सध्याचा कालवा ३५ किलोमीटर लांबीचा आहे, तर बोगदा २५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास जवळपास अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. खडकवासला धरणातून कालव्यात सोडले जाणारे पाण्याचे बाष्पीभवन, गळती, चोरी आदींमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय, कालव्यात पडणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते. यासर्व पार्श्‍वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखली होती.

मात्र, त्यासाठी निधी कसा उभारावा, याबाबतचा प्रश्‍न होता. त्यामुळे ही योजना गेली अनेक वर्ष रखडली होती. मध्यंतरी पुन्हा या योजनेला चालना देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार निविदा मागवून एका खासगी कंपनीला हे काम दिले आहे. दोन महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत.

सुमारे दीड हजार कोटींचा खर्च

खडकवासला धरण ते फुरसुंगी हा कालवा बंद करून त्याऐवजी भूमिगत बोगद्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे एक हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्यालगत असलेली सुमारे दोन हजार हेक्‍टर जागा आहे. त्याचा व्यावसायिक पद्धतीने वापर केल्यास त्यातून मोठा निधी उभा राहू शकतो. या निधीतून बोगद्यासाठी येणारा खर्च करावा, असा विचार मध्यंतरी पुढे आला होता. त्यासाठी या जागेचा सविस्तर प्रकल्प अहवाल ‘पीएमआरडीए’ने करावा, असे जलसंपदा विभागाने ‘पीएमआरडीए’ला कळविले होते. तसे केल्यास बाष्पीभवन आणि गळतीमुळे होणारा पाण्याचा लॉस भरून निघण्यास मदत होईल. त्यातून सुमारे अडीच टीएमसी पाणी वर्षभरामध्ये वाचणार आहे. मात्र, ‘पीएमआरडीए’ने त्यास नकार दिला होता. त्यामुळे आता खुद्द जलसंपदा विभागानेच हा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य...

२५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याच्या कामासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. साधारणत: एक टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष धरण उभारणे, यासाठी सुमारे एक हजार कोटींचा खर्च येतो. यानुसार अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागू शकतात. मात्र, बोगद्यातून पाणी नेणे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नव्या धरणाऐवजी हा पर्याय...

‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा तयार करताना नवीन धरण उभारण्याबाबतचा विचार पुढे आला होता. परंतु, कृष्णा पाणी तंटा लवाद प्राधिकरणानुसार पुणे जिल्ह्यात नवे धरण बांधणे शक्‍य नाही. कारण आवश्‍यक असलेले पाणी यापूर्वीच अडवून त्यावर धरणे बांधण्यात आली. तसेच, नवीन धरण बांधायचे झाल्यास नवीन जागेचा शोध घ्यावा लागेल. याचसह भूसंपादन आणि पुनर्वसन हे काम आता अवघड आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

कालव्याच्या मार्गात बदल होणार

  • खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्याची लांबी ३५ किलोमीटर

  • भूमिगत कालव्याच्या मार्गात काही ठिकाणी बदल होणार

  • सुमारे दहा किलोमीटरने अंतर कमी होणार

  • सध्याच्या कालव्याची जागा भविष्यात अन्य कामासाठी उपयोगात येऊ शकते

  • याचे सर्वेक्षण पूर्ण होऊन प्राप्त अहवालातून माहिती समोर येणार

Web Title: Plan To Carry Water From The Tunnel Between Khadakwasla Dam And Fursungi Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top