करिअरसाठी प्लॅनिंग करा - विवेक वेलणकर

करिअरसाठी प्लॅनिंग करा - विवेक वेलणकर

पिंपरी - करिअरसाठी प्लॅनिंग करा. त्यासाठी पर्याय वाढले असले, तरी स्पर्धाही वाढल्या आहेत. मात्र, करिअर करताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही, असे मत विवेक वेलणकर यांनी व्यक्‍त केले.

वेलणकर म्हणाले, ‘‘दहावीनंतर आयटीआय मध्येही डिप्लोमाचे अनेक कोर्सेस आहेत. यामधून अनेक शासकीय नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. हॉटेल मॅनेजमेंट करता येते. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीदेखील करता येते. डिप्लोमाच्या आधारे रेल्वेचे चालक म्हणूनही नोकरी मिळते. सध्या रेल्वेच्या चालकांना एक लाख पगार आहे. बारावीनंतर सीईटीची परीक्षा देऊन लॉही करता येतो. या व्यवसायात तासाला एक लाख रुपयांपासून ते वर्षाला एक लाख रुपये कमविता येतात. कम्युनिकेशन केल्यावर प्रसार माध्यमांमध्ये काम करता येते. आयआयटी पवई येथे डिझायनिंगचेही शिक्षण घेता येते. त्यासाठी स्थानिक पातळीवर परीक्षा असतात. बीबीए केलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा देऊन एमबीए केल्यास त्यास नोकरीमध्ये संधी असते. संगणक क्षेत्रासाठी बारावीपर्यंत शिक्षण घेताना संगणकाचा सी लॅंग्वेज हा अभ्यासक्रम शिकल्यास पुढील कम्युटर सायन्समधील अभ्यासक्रमात त्याची मदत होते.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘पदवी मिळाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देता येतात. मात्र, त्याच तयारी अकरावीपासूनच पाच-सहा तास अभ्यास करून करता येईल. पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपला ९० टक्‍के अभ्यास झालेला असेल. ज्यांना लष्करात जायचे आहे, त्यांना बारावीनंतर एनडीएद्वारे जाता येते. दर सहा महिन्याला परीक्षा होऊन त्यातून चारशे जणांची निवड केली जाते. याशिवाय, बारावी सायन्सनंतर लष्करात मेडिकलचे शिक्षण घेता येते. सीएमईच्या माध्यमातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येतो. जेईई मेन्स परीक्षा दिल्यावर नेव्हीमध्येही जाता येते. एकदा निवड झाल्यावर पुढील शिक्षण मोफत असते. याशिवाय, पास झाल्यावर अधिकारी म्हणून किमान ८० हजार रुपये वेतन मिळते. पायलट होण्यासाठी सव्वा वर्षात ३५ ते ४० लाख रुपये खर्च येतो. मात्र, त्यानंतरही नोकरी मिळेलच, याची शाश्‍वती नसते.’’

आर्किटेक्‍चर करणाऱ्यांना अनेक संधी : डॉ. सोनवणे
डॉ. महेंद्र सोनवणे म्हणाले, ‘‘आर्किटेक्‍चरची परीक्षा राज्य पातळीवर तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दरवर्षी घेतली जाते. हा पाच वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून, तो पूर्ण केल्यानंतर ‘बॅचलर ऑफ आर्किटेक्‍चर’ अशी पदवी संबंधित विद्यापीठाकडून बहाल केली जाते. या पाच वर्षांत बेसिक डिझाइन, बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन व मटेरिअल, ग्राफिक्‍स, प्रोफेशनल ट्रेनिंग अशा अनेकविध विषयांचा अभ्यास करता येतो. मोठी शहरे, विकसनशील गावे, रिअल इस्टेट, बिल्डर्स, आर्किटेक्‍टचे कार्यालय, ज्या ठिकाणी विकासाची कामे सुरू आहेत, अशा सर्वच ठिकाणी आर्किटेक्‍टची आवश्‍यकता भासते. आर्किटेक्‍चरचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तींसाठी संधीची अनेक दारे खुली आहेत.’’

इंडस्ट्रीज ओरिएंटेड महाविद्यालय निवडावे : प्रा. रवंदळे
प्रा. शीतलकुमार रवंदळे म्हणाले, ‘‘अनेक महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असतो. शुल्काच्या तुलनेत विद्यार्थ्यांना पुरेसे ज्ञान दिले जात नाही. रोजगाराभिमुख बनविले जात नाही. ज्या महाविद्यालयात मुलांना ‘इंडस्ट्रीज ओरिएंटेड’ शिक्षण दिले जाते, अशाच महाविद्यालयात मुलांनी प्रवेश घ्यावा. अभियांत्रिकी शाखेच्या मुलांनी जेथे कॅम्पस प्लेसमेंटची सुविधा आहे अशा व ‘ग्रुप ऑफ कॉलेज’ची निवड करावी. मुलांनी वैयक्तिक रुची दाखविल्यावरच यश मिळू शकते. तसेच, इंटिग्रेटेड कोर्सला प्राधान्य द्यावे. ‘पीसीसीओई’च्या कोणत्याही महाविद्यालयात गुणी शिक्षक, चांगल्या भौतिक सुविधा पुरविल्या जातात. कोअर प्लेसमेंटसह ‘ऑफ कॅम्पस’ची सोय आहे. त्यामुळे इतर राज्यातील मुलांनादेखील नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

एस. बी. पाटीलमध्ये विविध सुविधा : प्रा. संदीप पाटील
प्रा. संदीप पाटील म्हणाले, ‘‘महाविद्यालयाचे यश तेथील भौतिक सुविधा आणि वातावरणावर अवलंबून असते. एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात डिजिटल क्‍लासरूम आहेत. बायोलॉजी लॅब, कॉम्प्युटर लॅब अशा अनेक लॅबच्या सुविधा आहेत. मुला-मुलींसाठी वसतिगृहाची सोय आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची आणि त्यांच्या प्रवासखर्चाची बचत होते. 

महाविद्यालयाचा युडायस क्रमांक  तपासणे आवश्‍यक : पाटील
कांचन पाटील म्हणाल्या, ‘‘केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती (कॅप)द्वारे अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पुस्तिकेतील युजर आयडी व पासवर्डच्या मदतीने हा अर्ज भरायचा आहे. तो पासवर्ड कोणाला दाखवू नये, नाहीतर त्याचा गैरवापर होईल. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा युडायस क्रमांक तपासणे आवश्‍यक आहे. बायोफोकलसाठी वेगळ्या पद्धतीने प्रवेश होतात. या वर्षी इनहाउस कोटा दहा टक्के, मॅनेजमेंट कोटा पाच टक्के, तर अल्पसंख्याक कोटा ५० टक्के राहणार आहे.’’ 

क्रिएटिव्ह जगतात व्होकेशनल कोर्सला महत्त्व : प्रा. वाधवा
प्रा. ललित वाधवा म्हणाले, व्होकेशनल कोर्समध्ये विविध करिअर क्षेत्रांतील कामांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. पारंपरिक शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार केवळ सैद्धांतिक शिक्षण यात नसते, तर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा काही जास्त हवे आहे, त्यांनी व्होकेशनल कोर्सची निवड करावी. क्रिएटिव्ह जगतात ॲनिमेशन किंवा ब्यूटी यासारखे विविध व्होकेशनल कोर्स उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्राकडे ओढा असणारे विद्यार्थी मेकॅनिकल शाखेतील डिप्लोमा करू शकतात किंवा कॉम्प्युटर ॲसेम्ब्लिंगचा विचार करू शकतात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com