दिव्यांगांसठी क्रीडा अॅकॅडमी सुरू करणार : आयुष प्रसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

दिव्यांग क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षांपासून पुरस्कार दिले जातील, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.

हडपसर : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडागुणांना विकसित करण्यासाठी जिल्ह्यात एक क्रीडा अॅकॅडमी सुरू करणार तसेच दिव्यांग क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षांपासून पुरस्कार दिले जातील, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग विदयार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी प्रसाद बोलत होते. याप्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, वैद्यकीय समाजिक कार्यकर्त्या रोहिणी मोरे, बालकल्याण संस्थेच्या व्यवस्थापिका अपर्णा पानसे उपस्थित होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रसाद पुढे म्हणाले, दिव्यांग विदयार्थ्यांमध्ये विविध कलागुण दडलेले असतात, त्यांचा शोध घेऊन ते विकसित करण्यासाठी जिल्हा समाज कल्याण विभाग उत्तम कार्य करत आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होत आहे. दिव्यांग विदयार्थ्यांमधील आत्मविश्वास जागा करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे. जन्म कुठे, कसा घेणे आपल्या हाती नाही. मात्र, मिळालेल्या जन्माचे सार्थक करणे आपल्या हाती असून दिव्यांग विदयार्थी हे निसर्गाने केलेल्या अन्यायावर मात करून जगत असल्याचे पाहिल्यानंतर त्यांचा मोठा अभिमान वाटला. त्यांना प्रत्येकाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

कोरगंटीवार म्हणाले, आपल्याकडे काही कमी आहे, हे दुःख उगाळत न बसता आलेल्या परिस्थितीवर मात करून आनंदात जगण्याचा संदेश देणा-या दिव्यांग विदयार्थ्यांमधील आत्मविश्वास कौतुकास्पद आहे.

विशेष गरजा असणा-या बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्यामध्ये असलेल्या अध्ययन शैलीनुसार सूप्त गुणांचा विकास होण्यासाठी सर्वाना समान संधी या तत्वानुसार कला, क्रिडा, संगित, नाटय, अभियन क्षेत्रातही संधी देऊन इतरांप्रमाणे खेळता, गाता, अभिनय करता यावा, या उददेशाने विशेष शाळा कार्य करत आहे, ते कौतुकास्पद आहे.
या स्पर्धेत जिल्हयातील ६५ शाळा व १५०० विदयार्थी सहभागी झाले आहे. दोन दिवस चालणा-या स्पर्धेत धावणे, पासिंग द बॅाल, लांबउडी, गोळाफेक, जलतरण, बुध्दीबळ, व्हिलचेअर रेस आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. मतीमंद, अस्थिव्यंग, अंध, कर्णबधीर विदयार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. कामायणी संस्थेच्या बॅंड ने व पताशीबाई लुंकड अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताद्वारे पाहूण्याचे स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: planning for new sports academy for handicapped students says Ayush Prasad