‘स्थायी’साठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

पिंपरी - महापालिकेत अवघ्या चारच दिवसांत भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर निवडला जाणार आहे. त्यानंतर लगेचच स्थायी समिती व अन्य विषय समित्यांसाठी सदस्यनिवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यातही विशेष महत्त्वाचे स्थायी समिती सदस्यपद आणि अध्यक्ष पदावर संधी मिळविण्यासाठी भाजपमधील इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

पिंपरी - महापालिकेत अवघ्या चारच दिवसांत भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर निवडला जाणार आहे. त्यानंतर लगेचच स्थायी समिती व अन्य विषय समित्यांसाठी सदस्यनिवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यातही विशेष महत्त्वाचे स्थायी समिती सदस्यपद आणि अध्यक्ष पदावर संधी मिळविण्यासाठी भाजपमधील इच्छुक नगरसेवकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

भाजपतर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ पक्षनेता म्हणून एकनाथ पवार यांना; तर महापौर पदासाठी नितीन काळजे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दोन महत्त्वाची पदे भोसरी मतदारसंघात गेली आहेत. पिंपरी मतदारसंघातून उपमहापौर पदासाठी शैलजा मोरे यांना संधी देण्यात आली. आता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी चिंचवड मतदारसंघातील उमेदवाराला संधी मिळणे अपेक्षित आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

१६ व्या जागेसाठी अपक्षांचे गणित
सोळाव्या जागेसाठी राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांपैकी एका सदस्याला संधी मिळू शकते. ही जागा मिळविण्यासाठी अपक्षांच्या मदतीने संख्याबळ कोण पूर्ण करते, त्यावर पुढचे गणित अवलंबून आहे. महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या पाचही अपक्षांना आपल्या बाजूला ठेवून संबंधित अपक्ष आघाडीतील एका नगरसेवकाला स्थायी समिती सदस्य पदासाठी संधी देण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. 

राष्ट्रवादी/शिवसेनेत लक्षवेधक
स्थायी समिती सदस्यपदासाठी राष्ट्रवादीला संख्याबळानुसार ४ जागा मिळणे निश्‍चित असल्याने संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेला एक जागा मिळणार असल्याने कोणत्या सदस्याला संधी मिळते, हे लक्षवेधक ठरणार आहे. 

महापालिकेतील विविध पदाधिकाऱ्यांची निवड होताना विधानसभानिहाय पदवाटप करण्याचे कोणतेही नियोजन ठरलेले नाही. पिंपरी-चिंचवड शहर हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवूनच पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जात आहे. स्थायी समितीबाबतही शहर केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घेतला जाईल. पक्षात आमदार महेश लांडगे किंवा आमचा स्वतंत्र असा गट कार्यरत नाही. 
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

महापौर आणि उपमहापौरपदाची १४ तारखेला निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थायी समिती आणि अन्य विषय समित्यांच्या सदस्यपदाबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मार्चअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
- एकनाथ पवार, गटनेते, भाजप

महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप    ७७
राष्ट्रवादी    ३६
शिवसेना    ९
मनसे    १ 
अपक्ष    ५ 
एकूण    १२८

‘स्थायी’साठी

एकूण जागा १६ 
भाजप    १०
राष्ट्रवादी काँग्रेस    ४
शिवसेना    १ 
राष्ट्रवादी/शिवसेना    १

Web Title: planning for standing committee