पुण्यात तीन हजार जणांना लस देण्याचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 December 2020

पुणे शहरातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार केलेल्या डॉ. नायडू रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिकांसह या आजाराचा संसर्ग रोखण्याच्या मोहिमेत थेट सहभाग घेतलेल्या सुमारे तीन हजार जणांना लस देण्याचे नियोजन महापालिका करीत आहे.

डॉक्‍टर, परिचारिकांसह रुग्णालय कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य
पुणे - शहरातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार केलेल्या डॉ. नायडू रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिकांसह या आजाराचा संसर्ग रोखण्याच्या मोहिमेत थेट सहभाग घेतलेल्या सुमारे तीन हजार जणांना लस देण्याचे नियोजन महापालिका करीत आहे. महापालिकेची रुग्णालये, कोविड हॉस्पिटल, ‘जम्बो’तील उपचार व्यवस्थेतील घटकांनाही यामध्ये सामावून घेतले जाणार आहे. दुसरीकडे, कोरोनाची अतिलक्षणे असलेल्या रुग्णांपर्यंत लस पोचण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य खात्यातील विशेषतः थेट उपचार व्यवस्था आणि बाधित क्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांवर प्राधान्याने लसीकरण करणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले. पुणे शहरात ९ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला; त्यानंतर या आजाराचा संसर्ग वाढत जाऊन एका दिवसांत सर्वाधिक दोन हजार २५० रुग्ण सापडल्याची नोंद आहे. रुग्ण वाढीचा वेग आणि त्यावरील उपायांची यंत्रणा उभारताना महापालिकेने मनुष्यबळात वाढ केली आहे. या साथीत महापालिकेचे सुमारे १८ हजार अधिकारी-कर्मचारी काम करीत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने मनुष्यबळही कमी झाले आहे. सध्या उपचार आणि त्यासंबंधीच्या कामात महापालिकेचे तीन हजार अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.

व्वा, क्या बात है! वयाच्या ७२ व्या वर्षी स्वाभिमानाने जगणारे बासरीवाले आजोबा; एकदा व्हिडिओ बघाच

या पार्श्‍वभूमीवर नव्या वर्षात कोरोनावरील लस येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्याचवेळी लसीकरणाचेही नियोजन आरोग्य व्यवस्थेकडून करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यांत कोरोनायोद्धांना म्हणजे, उपचार व्यवस्थेतील घटकांना लस देण्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यानुसार महापालिकेने लसीकरणासाठी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉक्‍टर, परिचारिकांसह त्या-त्या रुग्णालयांतील सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षकांना लस देणार असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कचऱ्याचे ढीग; व्यावसायिकांकडून होतेय विद्रुपीकरण

खासगी रुग्णालयांनाही प्राधान्य
कोरोनाच्या साथीमुळे महापालिकेपाठोपाठ काही खासगी रुग्णालयांतील बेड राखीव ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हा, रुग्णांवरील उपचारासाठी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना महापालिकेने खासगी रुग्णालय व्यवस्थापनाला केल्या होत्या. या काळात खासगी रुग्णालयाचीही मदत झाल्याने त्यांना प्राधान्याने लस देणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

  • ९ मार्च - पुण्यातील पहिला रुग्ण
  • ३० मार्च - पुण्यातील महिला कोरोना मृत्यू 
  • २ हजार २५० - एका दिवसांतील सर्वाधिक रुग्ण
  • ७१ - महापालिकेची रुग्णालये 
  • १ हजार २६४ - आरोग्य खात्यातील मनुष्यबळ 
  • २००० - कोरोना मोहिमेसाठी जादा मनुष्यबळ

कोरोनावरील लस आल्यानंतर तिच्या साठवणीपासून वितरण व्यवस्थेच्या दृष्टीने प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण होईल. मात्र, त्यात उपचार करणाऱ्या घटकांना प्राधान्य असेल. रुग्णांना लस देण्याबाबतचे नियोजन अद्याप झालेले नाही. 
- डॉ. संजीव वावरे, साथरोग नियंत्रण अधिकारी, महापालिका 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planning to vaccinate 3000 people in Pune