भीमा नदी काठी झाडांच्या बुंध्यांचे पुनर्रोपण व रोपांची लागवड 

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 5 जून 2018

पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे ग्लोबल वॅार्मिंग, अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान अशा संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे हाच एकमेव मार्ग आहे, असे मत दौंड तालुक्याचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी व्यक्त केले आहे. 

दौंड (पुणे) : पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे ग्लोबल वॅार्मिंग, अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान अशा संकटांना तोंड द्यावे लागत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे हाच एकमेव मार्ग आहे, असे मत दौंड तालुक्याचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी व्यक्त केले आहे. 
  

दौंड शहरात  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भीमा नदीच्या काठावर बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते अहल्यादेवी होळकर दशक्रिया घाटाच्या परिसरात झाडांच्या बुंध्याचे पुनर्रोपण करण्याबरोबर एकूण ७० रोपे लावण्यात आली. वृक्षारोपण उपक्रमाचे संयोजक तथा क्रीडा शिक्षक माधव बागल यांच्यासह प्रदीप जहागीरदार, प्रमोद काकडे, सुनील स्वामी, सतीश सोनोने, सोनू सलगर, मंडल अधिकारी भानुदास येडे, तलाठी सुनील जाधव, महसूल कर्मचारी अण्णा शिंगाडे, श्री. आगलावे, विद्यार्थी रोहित त्रिभुवन, रोहित ठाकोर, महेश हुल्लेकर, ललीत महाजन, अक्षय अंकुश, आशितोष बहिरमल, कुणाल कलशेट्टी, प्रणव जोगदंड, आदी या वेळी उपस्थित होते. 

बालाजी सोमवंशी म्हणाले, "दौंड शहरात पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेले उपक्रम आणि त्यासाठी परिश्रम करणाऱ्या समविचारी लोकांनी नदीकाठी वृक्षारोपणाचा राबविलेला उपक्रम दिशादर्शक आहे. वृक्षारोपण करून न थांबता संवर्धनासाठी जातीने लक्ष द्यावे."
        शहरातील पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने घाट परिसरात जेसीबी यंत्राच्या साह्याने खड्डे घेऊन त्यामध्ये वड, पिंपळ, नांद्रुप, आदी झाडांच्या बुंध्याचे पुनर्रोपण करण्यात आले. घाटाच्या प्रवेशमार्गावर रोपे लावण्यात आली. सेंद्रिय खतांचा वापर या वेळी करण्यात आला. राष्ट्रीय हरित सेनेच्या कापडी पिशव्यांचे वितरण बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. वैभव टाटिया, योगेश चापोरकर, रमेश राठोड, संग्राम जाधव, विशाल मुनोत, दत्तात्रेय खानविलकर, आदींनी या उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य केले.

शहरातील कपिलेश्वर मंदिर प्रांगणात शहरातील व्यापारी राजेंद्र सरनोत व सुरेंद्र मुनोत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना 12 बाय 18 इंच आकाराच्या कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय हरित सेनेचे शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी विद्यार्थ्यांना या वेळी प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची माहिती देत पर्यावरण रक्षणासाठी स्वतः कापडी पिशव्यांचा वापर करून इतरांना त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले.

Web Title: Plantation from Environment Day outside of bhima river