प्लॅस्टिक कारवाईचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

पुणे - प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीस महापालिकेने सुरवात केली असून, पहिल्याच दिवशी ७३ जणांवर कारवाई करून ३ लाख ६९ हजार १०० रुपये दंड वसुल केला. दरम्यान, घरातील प्लॅस्टिकचे करायचे काय, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे; तर महापालिकेचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत असल्याचा आरोप व्यापारी करू लागले आहेत.

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी लागू केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अंमलबजावणीच्या दृष्टीने तयारी केली होती. यासाठी १४० निरीक्षक आणि ३० वरिष्ठ निरीक्षक आणि पथकांची नियुक्ती केली आहे. शनिवारी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाईस सुरवात करण्यात आली. प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांना काही ठिकाणी समज देण्यात आली. काही ठिकाणी कारवाई करून प्लॅस्टिक आणि थर्माकोल जप्त करण्यात आले. यापुढेही वापर सुरू राहिला, तर अधिक कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून दिला गेला. 

कचरा जमा करण्याचे आवाहन
महापालिकेने महिनाभरापूर्वी नागरिकांना आवाहन करून क्षेत्रीय कार्यालयात प्लॅस्टिक, थर्माकोलचा कचरा जमा करण्यास सांगितले होते. त्या वेळी ४२ टन प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा जमा झाले. नागरिकांनी त्यांच्याजवळील प्लॅस्टिकचा कचरा क्षेत्रीय कार्यालयात जमा करावा, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी केले आहे.

चिकन-मटण, मासेविक्रेते टार्गेट 
मटण, चिकन, तसेच मासे प्लॅस्टिक पिशव्यांतून देण्यात येतात. रविवार हा मांसाहारींचा खास दिवस असल्याने या विक्रेत्यांवर पालिकेचे पथक लक्ष ठेवणार आहे.

पहिल्याच दिवशी
७३ जणांवर कारवाई
३ लाख ६९ हजार रुपयांचा दंड वसूल
८ हजार ७११ किलो प्लॅस्टिक जप्त
७५ किलो थर्माकोल जप्त 
सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाई

Web Title: plastic ban crime