#PlasticBan ...त्यांच्यासाठी प्लॅस्टिकही आता कचराच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे - दिवसभर फिरून ७ ते ८ किलो प्लॅस्टिक गोळा होत होते. तेव्हा प्रतिकिलोला भावदेखील २५ रुपये मिळत होता. प्लॅस्टिकबंदी झाली आणि आता दिवसभर फिरल्यानंतर ३० ते ४० किलो प्लॅस्टिक गोळा होत आहे; पण प्रतिकिलोचा भाव १० रुपयांवर आला आहे...... यापुढे हे भाव आणखी कमी होतील. दिवसभर कष्ट करूनदेखील पोटभर खायला मिळणार का... हा प्रश्‍न आहे मांजरी बुद्रुक येथील इंदूबाई अडागळे यांचा.

 इंदूबाई या माळवाडी येथील मांजरी बुद्रुक येथे राहतात. त्या दररोज लक्ष्मी रस्ता आणि परिसरात येऊन कचऱ्यातून प्लॅस्टिक गोळा करतात. १२ वर्षे त्या हे काम करत आहेत. इंदूबाई या एक प्रतिनिधिक उदाहरण आहे. शहरात प्लॅस्टिक गोळा करणाऱ्या सुमारे तीन हजाराहून अधिक महिला आहेत. इंदूबाईंना दिवसभर प्लॅस्टिक गोळा केल्यानंतर २०० ते ३०० रुपये मिळत होते.  त्यांना चार मुले असून येणाऱ्या उत्पन्नात कुटुंबाचे भागत होते. सगळे काही सुरळीत चालू होते; पण राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी घातली. या बंदीची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली. त्याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबावर झाला आहे.

 काल संध्याकाळी नेहमीसारख्या इंदूबाई प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी बाहेर पडल्या. एरवी सात ते आठ किलो प्लॅस्टिक मिळत होते. काल मात्र ४ पोती म्हणजेच ३०-४० किलो एवढे प्लॅस्टिक गोळा झाले. त्यामुळे इंदूबाई यांचा चेहरा आनंदाने फुलला. चांगला पैसा मिळणार, या खुशीत त्या घरी पोचल्या; पण त्यांनी दुकानात जाऊन प्लॅस्टिकचे भाव विचारले, तेव्हा आनंदावर विरजण पडले. कारवाईच्या भीतीने नागरिकांनी रस्त्यावर प्लॅस्टिक फेकून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सध्या प्लॅस्टिक गोळा होत आहे. एकीकडे आनंद झाला, तर दुसरीकडे नवा प्रश्‍न उभा राहिला आहे; पण इंदूबाई मात्र त्यांच्याकडे ३०-४० किलो कचरा पडून आहे. तो त्यांनी अजूनही विकलेला नाही. भाव वाढतील या आशेवर त्या आहेत. प्लॅस्टिकचाही आता कचरा झाला हे अजूनही त्या स्वीकारू शकलेल्या नाहीत.

चार मुलांचे शिक्षण करावयाचे आहे. यापुढे भाव आणखी खाली येत राहणार, कुटुंबाचे कसे भागणार, मुलांच्या शिक्षणाचे काय, असे एक ना अनेक प्रश्‍न डोळ्यांपुढे आ वासून उभे आहेत.
- इंदूबाई अडागळे, कचरावेचक

Web Title: #PlasticBan InduBai Adagale Garbage collector