#plasticBan प्लॅस्टिक इथलं संपत नाही...!

योगीराज प्रभुणे
सोमवार, 25 जून 2018

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये कॅरी बॅग्ज घराबाहेर गेल्या असल्या तरीही बिस्कीटचे पुडे, चिप्स याचे प्लॅस्टिक कचऱ्याच्या रूपात अजूनही बाहेर पडत आहे; तसेच प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, ताटे यांचे कचऱ्यातील प्रमाण कायम असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये कॅरी बॅग्ज घराबाहेर गेल्या असल्या तरीही बिस्कीटचे पुडे, चिप्स याचे प्लॅस्टिक कचऱ्याच्या रूपात अजूनही बाहेर पडत आहे; तसेच प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, ताटे यांचे कचऱ्यातील प्रमाण कायम असल्याचे दिसून येत आहे. 

राज्यात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. हा निर्णय ते या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी यादरम्यानच्या 65 दिवसांमध्ये शहरातील कचऱ्यात प्लॅस्टिकचे प्रमाण काय होते, याचा अभ्यास "स्वच्छ' या संस्थेतर्फे करण्यात आला. त्यासाठी कचरावेचकांशी संवाद साधण्यात आला. त्याच्या विश्‍लेषणातून ही माहिती पुढे आली आहे. 

कॅरी बॅग्ज, प्लॅस्टिक पॅकिंग, एकदाच वापरणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू (ताटे, ग्लास, चमचे आदी), अनेक आवरणे असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू (बिस्कीट, चिप्स), कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्या यांचे कचऱ्यातील प्रमाण काय आहे, याची माहिती कचरावेचकांकडून घेण्यात आली. प्लॅस्टिकचे कचऱ्यातील प्रमाण कमी झाले, ते तसेच राहिले की, त्यात वाढ झाली याची माहिती त्यांच्याकडून घेतली. 

कचऱ्यात येणाऱ्या कॅरी बॅगचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याचे निरीक्षण कचरावेचकांनी नोंदविले आहे. प्लॅस्टिकचे ताटे, ग्लास, चमचे यांच्या कचऱ्यात फारसा फरक पडला नाहीच; उलट, शाम्पू, चिप्स, बिस्किटे यांचे कचऱ्यातील प्रमाण वाढल्याचेही कचरावेचकांशी साधलेल्या संवादातून अधोरेखित झाले आहे. 

सर्वेक्षणातील निष्कर्ष 
- शहरातील 63 टक्के कचरावेचक म्हणतात की कॅरी बॅगचे प्रमाण कमी झाले. 
- 49 टक्के कचरावेचकांचे मत आहे की प्लॅस्टिक पॅकिंगच्या प्रमाणात फारसा फरक पडला नाही 
- 79 टक्के कचरावेचक म्हणतात की, बिस्कीटचे पुडे, चिप्स या स्वरूपातील प्लॅस्टिकमध्ये बदल झाला नाही किंवा त्यात वाढ झाली नाही. 

कचरावेचकांकडून माहिती घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कचऱ्यात कॅरी बॅग्ज आणि गार्बेज बॅग्ज यांचे प्रमाण यापूर्वी मोठे असायचे; पण प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर यात लक्षणीय कमी झाल्याने बिस्कीटचे पुडे, चिप्ससाठी वापरलेल्या प्लॅस्टिकचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. 
-हर्षद बर्डे, प्रतिनिधी, स्वच्छ संस्था 

Web Title: #plasticBan Plastic does not end here

टॅग्स