नाटककाराला आविष्कार स्वातंत्र्य हवे - श्रीनिवास भणगे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नाटक हे प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य अंग आहे. प्रेक्षकाने विचारी होणे आवश्‍यक आहे. मात्र, प्रेक्षकांची मानसिकता अजूनही १९३०मधीलच आहे. अभिनय सोडून काहीही पाहा, अशी प्रेक्षकांना लागली आहे. प्रेक्षकवर्ग प्रगल्भ होण्यासाठी नाटककारांनी वैचारिक खाद्य पुरविले पाहिजे.
- श्रीनिवास भगणे, अभिनेते 

पुणे - मराठी भाषेत नाट्यलेखन होणार असेल तर मराठी संस्कृती, काळ आणि परंपरेचा अभ्यास व्हायला हवा. वास्तववादी नाटक व्हायलाच हवे, असे मत व्यक्त करीत नाटककाराला आविष्कार स्वातंत्र्य असले पाहिजे, अशी भूमिका अभिनेते श्रीनिवास भणगे यांनी मांडली.

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भरत नाट्य संशोधन मंदिर आणि ‘संवाद पुणे’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या संगीत नाट्य संमेलानांतर्गत पहिल्या मराठी नाट्य-तंत्रज्ञ संमेलनाला भरत नाट्य मंदिरात शुक्रवारी सुरुवात झाली. या संमेलनात आयोजित ‘नाट्यलेखन’ या विषयावर ते बोलत होते. भणगे यांची मुलाखत डॉ. समीर मोने यांनी घेतली. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, कार्याध्यक्ष अभय जबडे, राज काझी, ‘संवाद पुणे’चे सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.

कुठलीही कलाकृती वेडातून निर्माण होते, असे सांगून भणगे म्हणाले, ‘‘संगीताच्या प्रांतात ज्याप्रमाणे गुरुकुल पद्धती आहे, त्याप्रमाणे नाट्यलेखनात गुरुकुलची आवश्‍यकता नाही. नाटककार हा स्वतंत्रच असावा. लेखनाची आवड व लेखनाविषयी प्रेम निर्माण होण्यासाठी गुरूची आवश्‍यकता आहे. विचाराने थांबायचे नसेल तर गुरुकुल पद्धतीवर अवलंबून राहू नये’’ 

नाट्य लेखक आणि नाट्य दिग्दर्शकाने एकमेकांची भूमिका समजावून घेऊन कलाकृती निर्माण केल्यास ती अधिक प्रभावी होते, असे मत त्यांनी लेखक-दिग्दर्शक यांच्यातील वादावर बोलताना व्यक्त केले. काझी यांनी नाट्य-तंत्रज्ञ संमेलनाविषयी माहिती दिली. जबडे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र खरे यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The playwright wants freedom of invention shrinivas bhanage