पुण्यातील मोदींच्या सभेमुळे वाचली भाजपची लाज ! 

Narendra Modi
Narendra Modi

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली नसती तर ? भाजपच्या पदरात फक्त कोथरूड, पर्वती आणि कसब्याची जागा पडल्या असत्या आणि शहरातील तब्बल 5 जागा आघाडीला मिळाल्या असत्या, अशी चर्चा शहर भाजपच्या वर्तुळात सुरू आहे. कारण खडकवासला, शिवाजीनगर, कॅंटोन्मेंटच्या जागाही अवघ्या दोन ते पाच हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आल्या आहेत. 

हडपसर, वडगाव शेरी या जागा गमावलेल्या जागांच्या धक्‍याबरोबरच शहरातील कोथरूड, पर्वती सह उर्वरित सहाही मतदारसंघात घटलेल्या मताधिक्‍याबद्दलचाही भाजपला धसका बसला आहे, हे शहर आणि प्रदेश स्तरावरील नेते- कार्यकर्त्यांशी चर्चा करताना दिसून आले. लोकसभेला आठही विधानसभा मतदारसंघातील मताधिक्‍य अवघ्या सहा महिन्यांत एवढे कसे घटले, याची काळजीही भाजपच्या नेत्यांना लागली आहे. त्यामुळेच शहरातील आठ जागांपैकी सहा जागी मिळालेल्या विजयाचा जल्लोष करण्याच्या मनःस्थितीत भाजपचे कार्यकर्ते नाहीत. खडकवासल्यात भीमराव तापकीर आले फक्त 2595 मतांनी, कॅंटोन्मेंटमध्ये सुनील कांबळे आले फक्त 5012 मतांनी तर, शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ कांबळे आले फक्त 5124 मतांनी. प्रदेशाध्यक्षांनाही अपेक्षित मतदान कोथरूडसारख्या सेफ मतदारसंघातून मिळविता आले नाही तर, पर्वतीमध्येही लाखाचे मताधिक्‍य भाजपसाठी दूरच राहिले. कसब्यात 'प्लॅंटेड' विशाल धनवडे होते म्हणून भाजपला सहज विजय मिळविता आला अन त्या मागचा धनी कोण होता हेही आता सर्वांच्या चर्चेत येऊ लागले आहे. 

पुण्यातील वातावर एकदम पॉझिटिव्ह आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सभा घेतलीच नाही. मोदींची सभा असल्यामुळे मुख्यमंत्री आले नाही, असे प्रदेश कार्यालय सांगते. एक मात्र, झाले मोदी आले आणि त्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून तरी काठावरच्या खडकवासला, कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगरच्या जागा तरी भाजपच्या पदरात पडल्या. मोदींची सभा झाली नसती तर या जागाही गेल्या असत्या, असेच मत भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. खडकवासल्यात विजयाला गवसणी घातली पण, शेवटच्या क्षणी निवडणूक गेली, अशी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते तर, शिवाजीनगर आणि कॅंटोन्मेंटमध्ये थोडा अजून प्रयत्न केला असता तर, बरं झाले असते, असे कॉंग्रेसचे मोहन जोशी यांचे वक्‍तव्य निकालापलिकडचे चित्र स्पष्ट करते. म्हणूनच भाजपचे कायकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आता मोदींचे आभार मानत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com