भाजपच्या संभाव्य यादीचे रंगले नाट्य 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या 136 संभाव्य उमेदवारांची यादी गुरुवारी सायंकाळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईतून पाठविण्यात आली. त्यात तीन विद्यमान नगरसेवकांच्या नावांचा समावेश नसल्यामुळे पक्षात खळबळ उडाली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेसची आघाडी होत असल्याचे समजताच भाजपने संभाव्य यादीतील काही उमेदवारांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. 

भाजपच्या यादीतील प्रामुख्याने वडगावशेरी, हडपसर, खडकवासला, कॅंटोन्मेंट, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांच्या प्रभागांतील निश्‍चित झालेल्या उमेदवारांशी पक्षकार्यालयातून गुरुवारी सकाळपासूनच संपर्क साधण्यात येत होता. कोथरूडमध्ये एका ठिकाणी पक्षाचा एक पदाधिकारी उमेदवारांकडून दोन लाख रुपये पक्षनिधी डीमांड ड्राफ्टद्वारे स्वीकारत होता. त्यानंतर उमेदवारांना अधिकृत उमेदवारी पत्र (एबी फॉर्म) देण्यात येत होता. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पक्षाकडून काही पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवारांची यादी पाठविण्यात आली. त्यानुसार उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनी जल्लोष केला. त्याचे पडसाद व्हॉटसऍप, फेसबुक, ट्विटरवर उमटत होते.

काही ठिकाणी गुलाल उधळून आनंदही व्यक्त करण्यात येत होता. मात्र, पहिल्या यादीत पालकमंत्री बापट समर्थक नगरसेवक अशोक येनपुरे, दिलीप काळोखे, तसेच राजेंद्र शिळीमकर यांच्या नावांचा समावेश नव्हता, त्यामुळे त्यांनी नेत्यांकडे धाव घेतली. कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे यांच्यासाठी अशोक येनपुरे, तर गायत्री खडके सूर्यवंशी यांच्यासाठी काळोखे यांना डावलल्याचे पहिल्या यादीत दिसून आले. तसेच, गोपाळ चिंतल यांच्यासाठी राजेंद्र शिळीमकर यांना वगळण्यात आले. शिळीमकर यांनी प्रभाग 35 मध्ये लढत द्यावी, असा पक्षातील काहीजणांचा आग्रह आहे. 
दरम्यान, राष्ट्रवादी- कॉंग्रेसची आघाडी होत असल्याचे समजल्यामुळे भाजपने संभाव्य उमेदवारांच्या यादीत बदल करण्याचे ठरविले, त्यामुळे अनेक पदाधिकारी रात्री पुण्यातून मुंबईस रवाना झाले. त्यामुळे संभाव्य उमेदवारांची यादी प्रसिद्ध न करण्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले. या घडामोडींदरम्यान शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालकमंत्री गिरीश बापट हे कोठे आहेत, याची माहिती कार्यकर्त्यांना समजू दिली जात नव्हती. 

Web Title: pmc bjp list