पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विविध पायाभूत सुविधा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर भर देणारा ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शुक्रवारी सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे अर्थसंकल्प सुपूर्त केला. या वेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त सौरभ राव, सर्वपक्षीय गटनेते उपस्थित होते. पायाभूत सुविधांवर भर देतानाच या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या अनेक योजना मार्गी लावण्यासाठी भरीव तरतूद यामध्ये आहे. खर्चात बचत आणि उत्पन्नाचे नवे कोणतीही स्रोत न सुचविता महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या प्रारूप अर्थसंकल्पात तब्बल ६८० कोटी रुपयांची वाढ स्थायी समितीने केली आहे. एकीकडे अर्थसंकल्प फुगविताना दुसरीकडे मात्र महसुली कामांसाठी प्रशासनाने केलेल्या तरतुदींना सरसकट तीस टक्क्यांनी कात्री लावली आहे. याच वेळी विविध योजनांचे प्रस्ताव यात मांडण्यात आले आहेत. शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी रस्ते, उडाण पूल, ‘हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट’ (एचसीएमटीआर), शिवणे-खराडी रस्ता, मेट्रो, पीएमपीसाठी बस याचबरोबरच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर आदी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.
पुढील आर्थिक वर्षात महापालिका आयुक्तांनी मिळकत करातून १ हजार ७२१ कोटी उत्पन्न धरले होते. त्यामध्ये स्थायी समितीने आणखी २०० कोटी रुपये वाढ अपेक्षित धरली आहे. आयुक्तांनी विकास कामांसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज अपेक्षित धरले होते. समितीने त्यामध्ये दुपटीने म्हणजे २०० कोटी रुपयांनी वाढ गृहीत धरून चारशे कोटी रुपये जमेच्या बाजूला गृहीत धरले आहेत. खर्चाच्या बाजूला सेवकवर्ग १ हजार ६७०, इतर खर्च ८८१ कोटी, विजेवरील खर्च २५४ कोटी, पाण्यावरील खर्च १७० कोटी रुपये अपेक्षित धरला आहे. औषधे आणि वॉर्डस्तरीय कामांसाठी केवळ ८२ कोटी आणि क्षेत्रीय कार्यालयातील कामांसाठी ४३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामध्ये महापालिकेच्या सवेक वर्गाला सातवा वेतन आयोग देण्यासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे.
शिवसृष्टीच्या कामाला गती
कोथरूडमधील चांदणी चौकातील जैवविविधता प्रकल्पाच्या ५० एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यात येणार असून, त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिला वेग देण्यासाठी २६ कोटी ४० लाख रुपये तरतूद केली आहे. या जागेत शिवसृष्टी उभारण्यास विशेष बाब म्हणून राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पुढील टप्प्यातील कामांना गती देण्यात येणार आहे.
शशिकांत भागवत क्रीडा संग्रहालयाची उभारणी
दैनिक ‘सकाळ’मधील क्रीडा विभागाचे माजी प्रमुख शशिकांत भागवत यांच्या स्मृतीनिमित्त बाबूराव सणस मैदानाच्या आवारात क्रीडा संग्रहालय आणि क्रीडा माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून नव्या खेळाडूंना खेळांचा इतिहास, प्रशिक्षण, संधी, खेळांमधील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी पोचविणे, ई-लायब्ररी आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. संग्रहालय आणि केद्राला भागवत यांचे नाव देण्यात येणार आहे.
कुलकर्णी यांच्या नावाने प्रशिक्षण कार्यक्रम
‘सकाळ’मधील मुख्य उपसंपादक डी. आर. कुलकर्णी यांच्या स्मृत्यर्थ नावाने गृहनिर्माण संस्था प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पुणे शहरात सुमारे २० हजार गृहनिर्माण संस्था आहे. त्यांचे कामकाज, प्रश्न, विकासकामे, त्यात लोकांचा सहभाग या संदर्भात संस्थांच्या संचालकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. त्याकरिता विविध शहरांत कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी (आकडे रुपयांत)
७० कोटी पंतप्रधान आवास योजना
८० कोटी मुळा-मुठा शुद्धीकरण-नदीकाठ सुधारणा
५० कोटी स्मार्टसिटी प्रकल्प
७ कोटी नदीसुधार प्रकल्प (जायका)
५० लाख पुष्पक शववाहिनी
५० लाख गदिमा स्मारक
३.५ कोटी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक
११.४ कोटी बालगंधर्व पुनर्विकास
२.१७ कोटी वारकरी भवन
१.१७ लाख हज हाउस
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सहाशे कोटी
पुणेकरांना सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक देण्यासाठी ‘हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट’ (एचसीएमटीआर), बालभारती- पौड रस्ता, शिवणे- खराडी रस्त्यांच्या कामांना गती देण्यासोबतच नगर स्त्यावर उपाययोजना, रामवाडी ते वाघोली मेट्रो, नवे उड्डाण पूल, वेगवेगळ्या भागांत वाहनतळांच्या निर्मितीच्या योजना आखण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांसाठी स्थायी समितीने सहाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मेट्रोचे जाळे विस्तारण्यालाही प्राधान्य देण्यात आले असून, पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
एचसीएमटीआर रस्त्याच्या कामासाठी दोनशे कोटी देण्यात आले आहेत. तसेच, नगर रस्त्यावर उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटर, पुलांचे विस्तारीकरण करण्यासाठी ९२ कोटी दिले आहेत. त्यापाठोपाठ सिंहगड रस्ता, पाषाण- सूस, धायरी फाटा येथील उड्डाण पुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
शहरात पुरेशी पार्किंग व्यवस्था उभारणाच्या हेतूने आखलेल्या पार्किंग धोरणाकरिताही २९ कोटी ५४ लाखांची तरतूद अहे. त्यातून जंगली महाराज रस्ता, दत्तवाडी, बाणेर, वारजे, विमाननगर, कोंढवा (बु.) आदी भागांत वाहनतळांची निर्मिती केली जाणार आहे. गेली अनेक वर्षे रेंगाळेल्या बालभारती- पौडफाटा रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असून, त्यासाठी २८ लाख रुपये दिले आहेत.
कात्रज- कोंढवा रस्त्यावरील उपाय योजनांसाठी ५५ कोटी ३० लाख रुपये, तर रखडलेल्या शिवणे- खराडी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे म्हटले आहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वर्दळीच्या रस्त्यांवर शंभर नवे ट्राफिक वॉर्डन नेमण्यात येणार आहेत.
योजना आणि तरतुदी
रामवाडी- वाघोडी मेट्रो (डीपीआर) - ८ कोटी
नगर रस्ता वाहतूक उपाययोजना - ९२ कोटी
कात्रज- कोंढवा रस्ता - ५५ कोटी ३० लाख
बालभारती- पौड रस्ता - २८ लाख
शिवणे- खराडी रस्ता- २२ कोटी
समान पाणीपुरवठ्याच्या दिशेने वाटचाल
पुणेकरांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आखलेल्या समान पाणीपुरवठा आणि भामा आसखेड प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने स्थायी समितीने पावले उचलली आहेत. समान पाणीपुरवठा योजनेसाठी ३०१ कोटी तर, भामा आसखेडसाठी १८५ कोटींची तरतूद केली आहे. या तरतुदीतून पाणीपुरवठ्याच्या योजनांमधील महत्त्वाच्या टप्प्यांतील कामे होणार आहेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात पुणेकरांचे आणखी हाल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांना महत्त्व दिल्याचे दिसून येत आहेत. समान व शुद्ध पाणीपुरवठ्याच्या योजनेतर्गंत जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या आणि मीटर बसविण्याची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.
त्यात पहिल्या टप्प्यातील ६० टाक्यांची कामे सुरू असून, पुढील दीड महिन्यात २५ टाक्यांची कामे पूर्ण होतील. पुढच्या टप्प्यातील कामांना वेग देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याचाच भाग म्हणून ३०१ कोटी ४० लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे योजनेला गती येण्याची आशा आहे.
पूर्व भागातील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड प्रकल्पाला प्राधान्य राहिले आहे. या प्रकल्पातील ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी पहिल्यांदाच १८५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत त्याचे काम पूर्ण होऊन या भागाला पाणी मिळण्याची आशा आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणी आणि महापालिका यांच्यातील वादही संपुष्टात येण्याचा अंदाज आहे.
समान पाणीपुरवठा योजना ३०१ कोटी ४० लाख
भामा आसखेड प्रकल्प १८५ कोटी
‘ई-लर्निंग’साठी साडेतेरा कोटी
कोट्यवधी रुपये खर्चूनही महापालिकेच्या बहुतांशी शाळांत ‘ई-लर्निंग’ योजना सुरू झालेली नसतानाही आता पुन्हा या योजनेसाठी साडेतेरा कोटी रुपये दिले आहेत. त्याचवेळी तब्बल दीडशे शाळांमधील संगणक यंत्रणा कोलमडली असली तरी, संगणक लायब्ररीचे नाव पुढे करीत, पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शाळांमधील जुनी यंत्रणा कार्यान्वित करण्यापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी तरतुदीच्या आकड्यांची उधळण केल्याचे दिसून येत आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्याचा प्रयोग केला जाणार असून, त्यासाठी सव्वा कोटीची तरतूद आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन प्रेरणा योजनेतून विद्यार्थ्यांसाठी पुस्तके उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने ‘ई-लर्निंग’ योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत निम्म्याही शाळांत ती सक्षमपणे सुरू झालेली नाही. तरीही अर्थसंकल्पात ई-लर्निंगला महत्त्व दिले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.