#PMCBudget पुणेकरांच्या आरोग्यावर महापालिकेचा कागदोपत्रीच खर्च

PMC-Budget
PMC-Budget

महापालिकेचा गेल्या पाच वर्षांतील प्रत्यक्ष अर्थसंकल्प आणि त्यामुळे पुणेकरांच्या रोजच्या जगण्यातील बदल काय? हे जाणून घेतले असता पुणेकरांच्या जगण्यातील बदलांपेक्षा अर्थसकंल्पाचा आकार फुगत गेल्याचे चित्र ठळक झाले. त्यासंदर्भातील वृत्तमालिका....

पुणे - तुम्ही आजारपणात महापालिकेच्या रुग्णालयात गेला असाल? तुमचा अनुभव काय? डॉक्‍टर नसतील आणि उपचारही मिळाले नसावेत! परंतु, तुम्ही रुग्णालयांत आलात तेव्हा, डॉक्‍टर होते, तुमच्या आजाराचे निदान झाले आणि उपचार मिळाले. गेल्या पाच वर्षांत ७५ लाख रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांत कागदोपत्री उपचार झाले आणि त्याचा खर्च झाला १ हजार २०० कोटी रुपये.

पुणेकरांची सर्दी, ताप, थंडी आणि खोकल्यावरील उपचाराचा हा न पटणारा खर्च आरोग्य खात्याने पटवून दिला आहे. आरोग्य हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्याला प्राधान्य राहील, या उद्देशाने आरोग्य खात्याने दरवर्षी नवनव्या योजना मांडल्या. यात रुग्णांना मोफत तपासणी, उपचार आणि औषधेही दिली जातात. गेल्या पाच वर्षांत नेमकी किती रकमेची औषध खरेदी केली? हे पाहिले तर तो आकडा ८० कोटींचा आहे. मग, सुमारे सव्वाअकराशे कोटी रुपये गेले कोठे? या प्रश्‍नावर त्यापैकी निम्मा खर्च डॉक्‍टर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाल्याचे उत्तर मिळते. प्रत्यक्षात पगाराचा आकडा सुमारे साडेचारशे कोटी आहे. मग, आठशे कोटींचा खर्च जुळविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, परंतु त्यांना आपल्याच खात्याचे अंकगणित सोडविता आले नाही.

पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शहरी-गरीब योजनेची अंमलबजावणीचे कारण पुढे केले तरीही, या खात्याकडील खर्चाचा ताळमेळ लागलेला नाही. त्याचा अर्थ गेल्या पाच-सहा वर्षांत पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे कारण देत, पाचशे-सहाशे कोटी रुपये हडप झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यात अधिकारी-ठेकेदार आणि काही प्रमाणात लोकप्रतिनिधींचा हात असल्याचेही लपून राहिलेले नाही.

रुग्णांकडून दरवर्षी १० कोटी 
पुणेकरांना मोफत उपचार आणि औषधे दिली जातात, हे सांगण्यात येत असले तरी, रुग्णांकडून दरवर्षी १० कोटी रुपयांचे मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, गेल्या पाच वर्षांत ४५ कोटींचा महसूल जमा झाला आहे. 

पाच वर्षांत पाच रुग्णालये 
आरोग्य खात्याने गेल्या पाच वर्षांत १ हजार २०० कोटींचा खर्च दाखविला आहे. मात्र, या काळात पाच छोटी रुग्णालये वगळता पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत. तसेच, नवे डॉक्‍टर आणि कर्मचारी भरतीही झालेली नाही. त्यामुळे पुणेकरांच्या उपचारासह किरकोळ देखभाल-दुरुस्ती आणि काही फुटकळ योजनांवरच एवढा खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील गरीब रुग्णांना आवश्‍यक आरोग्यसुविधा दिल्या जातात. त्यात सर्व प्रकारचे उपचार व औषधे मोफत दिली जातात. नवीन यंत्रणेसाठी निधी खर्च होतो. एकूण तरतूद आणि त्याचा हिशेब आहे. 
- डॉ. रामचंद्र  हंकारे, प्रमुख आरोग्य विभाग, महापालिका

वर्ष            रुग्ण संख्या        तरतूद 
२०१४-१५    १४, १९६४२      १०० कोटी ५४ लाख 
२०१५-१६    १६,३८,८९७      १०७ कोटी २५ लाख ६६ हजार 
२०१६-१७    १४,६४, ९५५     २१८ कोटी ७१ लाख २७ हजार   
२०१७-१८    १४,९४८३६       २८७ कोटी ५५ लाख ९४ हजार  
२०१८-१९    १५, ३६, ८८०    २९० कोटी ६० लाख ३४ हजार 
२०१९-२०    -----------        ३०८ कोटी ७८ लाख (प्रस्तावित)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com