आघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - आम्ही मागितलेल्या १८ पैकी किमान दहा जागा राष्ट्रवादीने सोडाव्यात, अशी भूमिका मांडत काँग्रेसने आघाडीच्या निर्णयाचा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर्टात ढकलला. आघाडी होणार की नाही, याबाबत अधिकृत आणि स्पष्ट भाष्य करणे दोन्ही पक्षांनी टाळले असले, तरी दोन्ही पक्षांनी एकमेकांपासून काडीमोड घेण्याचे ठरविले असल्याचे राजकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

पुणे - आम्ही मागितलेल्या १८ पैकी किमान दहा जागा राष्ट्रवादीने सोडाव्यात, अशी भूमिका मांडत काँग्रेसने आघाडीच्या निर्णयाचा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर्टात ढकलला. आघाडी होणार की नाही, याबाबत अधिकृत आणि स्पष्ट भाष्य करणे दोन्ही पक्षांनी टाळले असले, तरी दोन्ही पक्षांनी एकमेकांपासून काडीमोड घेण्याचे ठरविले असल्याचे राजकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

महापालिकेची निवडणूक आघाडी करून लढण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात जागावाटपाचे प्रस्ताव एकमेकांना देण्यात आले आहेत; मात्र दोन्ही पक्षांतील विद्यमान नगरसेवकांसाठी जागा सोडण्यावरून कोंडी निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने झालेल्या चर्चांच्या फेऱ्यांमधून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आघाडीची चर्चा थांबल्याने दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याची शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दोनच दिवस राहिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आता आघाडीची चर्चा पूर्ण थांबवून सर्व लक्ष आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या निश्‍चित करून त्या जाहीर करण्याकडे दिले आहे. त्यानुसार पक्षाची यंत्रणा कामात गुंतली असून, उद्या दुपारपर्यंत पहिली यादी जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे.
आम्ही सातत्याने आघाडीबाबत सकारात्मक चर्चा केली; मात्र काही जागांबाबत एकमत झालेले नाही. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे. आता पुन्हा चर्चा करून पुढील निर्णय तातडीने घेतला जाईल, अशी भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची शक्‍यता धुडकावून लावली आहे.

दुसरीकडे, पक्षाच्या पातळीवर चर्चा करून आघाडीचा प्रस्ताव राष्ट्रवादीसमोर मांडला आहे. त्यावर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. यापूर्वी दावा केलेल्या १८ पैकी किमान दहा जागा राष्ट्रवादीने सोडाव्यात, अशा पवित्र्यावर काँग्रेस बुधवारी रात्रीपर्यंत ठाम होती. त्यामुळे बुधवारी दिवसभर आघाडीबाबत दोन्ही पक्षांकडून कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी आज नावे जाहीर करणार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी होण्याची शक्‍यता मावळल्यात जमा असल्याने दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार दोन्ही पक्ष गुरुवारी (ता. २) सायंकाळी पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे जाहीर करतील. त्यानंतर शुक्रवारी सकाळी काही जणांची यादी प्रसिद्ध करू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. तर, आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर करण्यात येईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

Web Title: pmc congress ncp