#PMCIssues पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - पुणेकरांनो, यंदाच्या पावसाळ्यात डेंगी, चिकुनगुनियापासून बचावासाठी तुम्हालाच सावधगिरी बाळगावी लागेल. कारण, कीटक नियंत्रण विभागाचा कारभार कोणी सांभाळायचा यावरून महापालिका प्रशासनात महिनाभर "तू-तू, मैं-मैं' झाल्यामुळे कीटकनाशक खरेदीला उशीर झाला आहे. यामुळे महापालिकेकडून डासांचा प्रतिबंध करण्यासाठी अद्याप पावलेच उचलण्यात आलेली नाहीत. 

पुणे - पुणेकरांनो, यंदाच्या पावसाळ्यात डेंगी, चिकुनगुनियापासून बचावासाठी तुम्हालाच सावधगिरी बाळगावी लागेल. कारण, कीटक नियंत्रण विभागाचा कारभार कोणी सांभाळायचा यावरून महापालिका प्रशासनात महिनाभर "तू-तू, मैं-मैं' झाल्यामुळे कीटकनाशक खरेदीला उशीर झाला आहे. यामुळे महापालिकेकडून डासांचा प्रतिबंध करण्यासाठी अद्याप पावलेच उचलण्यात आलेली नाहीत. 

पावसाळ्यात होणाऱ्या डेंगी, चिकुनगुनिया आणि हिवताप या कीटकजन्य आजारांचा उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जातात. पावसाळा तोंडावर आला तरीही महापालिकेने अद्यापपर्यंत कीटकनाशकांची खरेदीच केलेली नाही. तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या बदलीनंतर त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी आरोग्य खात्यात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने एप्रिलमध्ये काही बदल्या केल्या. त्यात कीटक नियंत्रण विभागाचे काम बघणाऱ्या डॉ. कल्पना बळिवंत यांच्याकडे जन्म-मृत्यू विभागाची जबाबदारी दिली. कीटकनाशक खरेदीची जबाबदारी सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्याकडे दिली. या बदलीच्या काळात म्हणजे एप्रिल-मेमध्ये पावसाळ्यासाठी आवश्‍यक कीटकनाशक खरेदीची वेळ निघून गेली. त्यामुळे आता जून उजाडल्यानंतर कीटकनाशक खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 21 दिवसांची असल्याने जुलैमध्ये प्रत्यक्ष कीटकनाशक मिळतील. 

राज्य सरकारच्या आदेशानुसार कीटकनाशक खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेला उशीर झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेनेही औषध खरेदीच्या निविदा काढल्या आहेत. पुढील 21 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. 
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका 

शहरात नवीन गावांचा समावेश झाल्याने राज्याच्या आरोग्य खात्याकडून काही प्रमाणात कीटकनाशके महापालिकेला मिळाली आहेत. तसेच, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरतील इतका कीटकनाशकांचा साठा महापालिकेत आहे. 
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका 

अशी घ्या काळजी... 
- आठवड्यातून एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावीत 
- पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने झाकून ठेवावे 
- घराभोवतीची जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी 
- घराच्या भोवताली टाकाऊ साहित्य ठेवू नये 
- टायर, काच, भंगार साहित्यात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा 

वर्ष .............. डेंगीचे रुग्ण ........ मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 
2015 ......... 399 ................ 1 
2016 ......... 739 ................. 1 
2017 ......... 1106 ............... 4 
(स्रोत - आरोग्य विभाग, पुणे महापालिका) 

Web Title: PMC does not buy pesticides Pune citizen health issue