"त्या' घरांतील मतांसाठी इच्छुकांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पुणे - "नमस्कार... मी आपल्या प्रभागातून अमुक पक्षातून इच्छुक आहे... मलाच मत द्या,' असे म्हणत डझनभर इच्छुक उमेदवार जर तुमच्या घरी आले तर? होय... प्रभागाच्या सीमावासीयांना हा अनुभव सध्या येत आहे. प्रभागाची अंतिम रचना आणि त्याचे नकाशे प्रसिद्ध झाले असले तरी काही घरे, सोसायट्या या नेमक्‍या कोणत्या प्रभागात समाविष्ट आहेत, याबाबत मतदारांसह इच्छुक उमेदवारांच्या मनातही संभ्रम आहे. त्याचाच परिणाम म्हणून अशा सीमावासीयांच्या घरी दोन्ही प्रभागांतील इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. 

सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. युती आणि आघाडी तुटल्यामुळे आता प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे. प्रत्येक प्रभागात सर्व पक्षांचे मिळून किमान डझनभर उमेदवार मतदारांच्या भेटी घेण्यासाठी नियोजन करत आहेत. तर भेटीपूर्वी कार्यपूर्तीचा अहवाल किंवा विकासकामे आणि आश्‍वासनांची पत्रके मतदारांच्या घरी पोचविण्यात येत आहेत. प्रभागाच्या सीमेवर राहणाऱ्या नागरिकांच्या घरी दोन्ही प्रभागांतील उमेदवारांची पत्रके गेले काही दिवस येत आहेत. ही पत्रके वाटणाऱ्या कार्यकर्त्यांनाही प्रभागाच्या निश्‍चित सीमा तपशीलवार माहिती नाहीत. आपल्या "भाऊ', "दादा', "नाना', "अण्णा'चे पत्रक प्रत्येक मतदाराच्या घरी पोचलेच नाही, असे होऊ नाही म्हणून "काळजीपोटी' ही पत्रके सर्वच घरी टाकण्यात येत आहेत. 

प्रभागाच्या हद्दीबाबत संभ्रम दूर करण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या प्रभागाच्या नावापुढे क्‍लिक करून नकाशाची "पीडीएफ' स्वरूपातील फाइल डाऊनलोड करून घेण्याकडे मतदारांचा कल आहे. या नकाशामध्ये संबंधित प्रभागाची हद्द लाल रंगात ठसठशीतपणे दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र या लाल रेषेनजीकच्या घरांबाबत मात्र संभ्रमावस्था कायम राहिली आहे. त्यामुळे नेहमीच्या आणि ठराविक ठिकाणी मतदान केंद्र असेलच अशी शक्‍यता आता राहिलेली नाही. त्यामुळे आपले घर नेमके कोणत्या प्रभागात समाविष्ट झाले आहे आणि त्याचे मतदान केंद्र कुठे असेल, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.

Web Title: pmc election interested candidate rush