आघाडीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने केलेल्या आघाडीचा सर्वाधिक फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला; तर सर्वांत मोठा फटका काँग्रेसला बसला. परिणामी, २८ जागांवरून काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या. त्यामुळे निवडणुकीपूर्वी स्वबळावर लढण्याची निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी योग्य असल्याचे बोलले जात आहे.

पुणे - महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने केलेल्या आघाडीचा सर्वाधिक फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला; तर सर्वांत मोठा फटका काँग्रेसला बसला. परिणामी, २८ जागांवरून काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या. त्यामुळे निवडणुकीपूर्वी स्वबळावर लढण्याची निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी योग्य असल्याचे बोलले जात आहे.

यंदा महापालिका निवडणुकीत प्रथमच दोन्ही काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा निर्णय घेतला. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत आघाडीचा हा घोळ संपला नाही. त्यातून काही प्रभागांत मैत्रीपूर्ण लढत, काही प्रभागात आघाडी, तर काही प्रभागांत स्वबळावर अशा अजब आघाडीचा फॉर्म्युला तयार झाला. त्यातून १७ प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण, १३ प्रभागांमध्ये आघाडी आणि ११ प्रभागांमध्ये स्वतंत्र लढतीच्या माध्यमातून दोन्ही काँग्रेस निवडणूक मैदानात उतरली. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून ही व्यूहरचना तयार करण्यात आली होती. दोन्ही काँग्रेसला याचा काही प्रमाणात तरी फायदा होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र निकालानंतर वेगळे चित्र समोर आले.

मैत्रीपूर्ण लढत झालेल्या प्रभागांमध्ये दोन्ही काँग्रेसच्या मतांमध्ये सरळ विभागणी झाली. त्याचा फायदा विरोधी पक्षाच्या उमेदवारांना झाला. १७ प्रभागांतील ६८ जागांपैकी केवळ १५ जागा दोन्ही काँग्रेसला मिळाल्या. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ जागांवर; तर काँग्रेसचे सहा जागांवर उमेदवार निवडून आले. प्रभाग क्रमांक २० ताडीवाला रोड या प्रभागात आघाडीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे तीन उमेदवार विजयी झाले. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर या प्रभागात दोन जागा काँग्रेसला मिळाल्या. उर्वरित चार प्रभागांत काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या आघाडीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला झाल्याचे समोर आले आहे.

स्वतंत्र लढतीचाही राष्ट्रवादीलाच लाभ
१३ प्रभागांत दोन्ही पक्षांनी आघाडी करून लढविलेल्या निवडणुकीतदेखील काँग्रेसला फार फायदा होऊ शकला नाही. या प्रभागांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले. आघाडीतील १३ प्रभागांतील ५२ जागांपैकी आठ जागांवर राष्ट्रवादीचे, तर सात जागी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. या उलट ११ प्रभागांतील स्वतंत्र लढतीमध्ये सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. पाच प्रभागांतील प्रत्येकी चार जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. उर्वरित प्रभागांमध्ये अनुक्रमे दोन व एक असे पक्षाचे उमेदवार विजयी झाले. 

Web Title: pmc election Profit NCP