सर्वसाधारण सभेत विरोधकांचा गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून आक्रमक होत महापालिकेतील विरोध पक्षांनी सर्वसाधारण सभेत गुरुवारी जोरदार आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू न दिल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात तोडफोड केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. विरोधकांना प्रत्युत्तर देत, सत्ताधारी भाजप सदस्यांनीही आरक्षण देणार असल्याचे सांगत, घोषणाबाजी केली. या गोंधळात सभा तहकूब करण्यात आली. 

 सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होण्याआधी शिवसेनेच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर येऊन मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी करीत घोषणा देण्यास सुरवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्यही आक्रमक झाले. तेव्हा भाजपच्या सदस्यांनी मराठा  समाजाला आरक्षण आम्ही देणार, अशा घोषणा दिल्या. दोन्ही बाजूंनी प्रचंड घोषणाबाजी झाल्याने सभागृहात गोंधळ उडाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सूचना करून आबा बागूल यांनी तहकुबी मांडली. त्यानंतर महापौर तहकुबी वाचत असताना, आम्हाला बोलायचे आहे, असे सांगत, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि नाना भानगिरे महापौरांच्या आसनाजवळ गेले आणि राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला, तो फसल्याने तेथील फुलांची कुंडी उचलून फेकली. त्यानंतर पाण्याचा ग्लास आणि अन्य साहित्यही फेकून दिले. भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यासह काही सदस्यांनी भोसले आणि भानगिरे यांना रोखले. तेव्हा सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतरही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या.   

सभागृहात चर्चा व्हावी, अशी बहुतेक सदस्यांची अपेक्षा होती. त्यानुसार कामकाज सुरू होते. तरीही आंदोलन सुरू राहिले. अशा पद्धतीची विरोधकांची कार्यपद्धती आम्ही खपवून घेणार नाही. सभागृहाचे संकेत पाळले पाहिजेत.
मुक्‍ता टिळक, महापौर

Web Title: PMC General Meeting Opposition confusion