पालिकेच्या आरोग्य विभागाला शिस्तीचा 'डोस' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

​पुणे शहरातील महापालिकेच्या 71 रुग्णालये आणि दवाखान्यांत रोज साधारपणे 12 हजार रुग्णांची नोंद होते. त्याशिवाय त्यांच्या नातेवाइकांचीही वर्दळ असते. मात्र डॉक्‍टर आणि अन्य कर्मचारी वेळेत उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना ताटकळ राहावे लागते.

पुणे : रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांची अडवणूक करणाऱ्या महापालिका रुग्णालये आणि मुख्य कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना महापालिकेने शिस्तीची "डोस' दिला आहे. रुग्णांना बाहेरची औषधे विकत घेण्याचा सल्ला न देण्याची तंबीही प्रभारी आरोग्य प्रमुखांनी दिली आहे. महापालिकेकडूनच रुग्णांना औषधे द्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

शहरी गरीब योजनेतील रुग्णांना औषधे नसल्याची कारणे देत, बाहेरून औषधे घेण्याचा सल्ला दिला जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत. औषधे विकत घेणे शक्‍य नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 

विविध प्रकारच्या तपासण्यांसाठी नोंदणी करण्यास रुग्णालयात कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे चित्र वारंवार दिसते. तसेच महापालिकेच्या मुख्य कार्यालयात नागरिकांना दाखले देण्यास कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. कार्यालयीन कामकाज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होत असतानाही बहुतांश अधिकारी-कर्मचारी वेळेत येत नसल्याचे उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रुग्णांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने कठोर पावले उचलली आहेत. विशेषत: अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात येण्याबाबत बजाविले आहे. त्याबाबत रुग्णालय आणि दवाखान्यांतील जबाबदार अधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे. 

येण्या-जाण्याच्या वेळांवरही नजर 
महापालिकेच्या मुख्य इमारतीतील आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी पूर्वकल्पना न देता दांड्या मारत असल्याचे दिसून आले आहे. काही कर्मचारी हे नेहमीच कार्यालयाबाहेरच्या कामात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण चकरा माराव्या लागतात. या पार्श्‍वभूमीवर मुख्य खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. 

रुग्णांची नोंदणी व उपचार करणारी यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्यांदा वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना सर्व घटकांना केल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई होईल. 
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmc health chief will take action against employees