#PMCIssue सल्लागार कंपनीचा भाव ७३ लाखांनी कमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

अंमलबजावणीतील अपयशाकडे दुर्लक्ष 
गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानात महापालिका ३७ व्या क्रमांकावर फेकली गेली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभियानाच्या अंमलबजावणीत कुठे कमी पडलो याची विचारणा केंद्र सरकारकडे करतानाच महापालिकेच्या पातळीवर त्यावर विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. परंतु, तसे काहीच घडत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुणे - घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी दोन कोटी रुपये मागणाऱ्या सल्लागार कंपनीला आधीच्या अपयशी प्रकल्पांची आठवण करून देत महापालिकेने कान टोचले. यामुळे या सल्लागार कंपनीने सल्ला देण्याचा भाव क्षणातच सुमारे ७३ लाख रुपयांनी कमी केल्याचे उघड झाले आहे. आता कंपनीसोबत केलेल्या नव्या करारात कामाची गुणवत्ता वाढविण्याची हमी महापालिका प्रशासन घेणार आहे.

शहरात घनकचरा व व्यवस्थापनासोबतच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबाजवणीसाठी महापालिकेने सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. आधी याच कामांसाठी नेमलेल्या केपीएमजी या सल्लागार कंपनीची नव्याने नेमणूक होणार आहे. यासाठी कंपनीला सुमारे १ कोटी २७ लाख रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात येणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने 
५७ प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांची उपयुक्ता वाढविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सल्लागार म्हणून ‘केपीएमजी’कडे काम देण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेने ९९ लाख रुपये मोजले होते. 

कंपनीसोबतच्या कराराची मुदत संपल्याने आता याच कंपनीला नेमण्यात येणार आहे. यासाठी पहिल्यांदा कंपनीने दोन कोटी रुपयांची निविदा भरली. मात्र, या कंपनीचा सल्ला घेऊनही १४ कचरा प्रकल्प बंद पडल्याची आठवण महापालिकेने करून दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Issue Consulting Company Rate Less Cleaning Campaign