Diwali
Diwali

#PMCIssue आमची दिवाळी अंधारातच...!

सिंहगड रस्ता - गेल्या वर्षीची दिवाळी आनंदात साजरी केली, सगळी तयारी केली होती. पण यंदाची दिवाळी अशी जाईल असे वाटले नव्हते. हक्काचे छत मिळाले असले तरी मात्र प्रकाशाचा सण दुसऱ्याकडून उजेड घेऊन साजरा करावा लागत आहे. कारण आम्हाला वीजमीटरच मिळाले नाहीत. वीजजोडणीही नाही.

सोसायटीच्या दिव्यातून वीज घेऊन घरात दिवे लागले. या भावना आहेत दांडेकर पूल परिसरात कालवा फुटीनंतर स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या.
कालवा फुटीनंतर सुमारे चाळीस कुटुंबाना राजेंद्रनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) स्थलांतरित करण्यात आले आहे. तर उर्वरित कुटुंबांना इतर ठिकाणी घरे मिळाली आहेत. नवीन घर जरी मिळाले असले, तरी जुन्या घराच्या आठवणी नागरिकांना स्वस्थ बसून देत नाहीयेत. 

याबाबत स्थलांतरित झालेले रहिवासी राजू कदम म्हणाले, की पूर्वीपेक्षा आताचे घर छान आहे. मात्र येथे सुखसुविधांची वानवा आहे. या ठिकाणी अजून दिवे नाहीत. नवीन घरात दिवाळी साजरी करताना आमच्या एका डोळ्यात हासू व दुसऱ्या डोळ्यात जुन्या घराच्या आठवणींनी अश्रू येत आहेत. पाणी आहे पण एकवेळच आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत. 

आम्ही सातव्या मजल्यावर राहत आहोत. काही गैरसोयी आहेत. पण किमान डोक्‍यावर हक्काचे छत असल्याचे समाधान वाटते. जुन्या घराची आठवण अद्याप पुसटही झाली नाही. 
- कुमिनदा कदम, रहिवासी

मी एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. तीन मुले, पत्नी, आणि आई असे आम्ही सहा जण येथे स्थलांतरित झालो. येथे वीज नसल्याने गैरसोय होत आहे. 
- सतीश आखाडे, रहिवासी

पालिकेकडून ज्या घरांची माहिती आली आहे, त्या घरांना वीजजोडणी दिली आहे. जी बाकी आहे ती तांत्रिक बाबींमुळे राहिली असतील. 
- गणेश लटपटे, कार्यकारी अभियंता, महावितरण, पर्वती विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com