PMC-Issue
PMC-Issue

#PMCIssue रुंद केलेल्या पदपथांवर दुकानदारांचेच बस्तान

पुणे - पादचारी मार्ग मोठे केले जात असले, तरी त्याचा फायदा पादचाऱ्यांऐवजी पथारी व्यावसायिक व दुकानादारांनाच होत आहे. या मार्गांवरून पादचाऱ्यांना कशीबशी वाट काढत चालावे लागते किंवा रस्त्याचा आधार घ्यावा लागत असल्याची विदारक स्थिती शहारात आहे.  

महापालिकेच्या पथ विभागाकडून ‘अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स’च्या मानांकनानुसार पादचारी मार्ग विकसित केले जात आहेत. शहरातील पादचारी मार्गांची लांबी ४०० किलोमीटर असून, त्यापैकी ७० ते ८० किलोमीटरच्या मार्गांचे काम झाले आहेत. पादचारी मार्ग मोठे झाल्याने नागिरकांना सुरक्षित चालता येईल, असा हेतू होता; पण गेल्या पाच महिन्यांत सुमारे २५ पादचाऱ्यांचा अपघातात बळी गेला आहे. 

लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शनिपारकडून मंडईकडे जाणारा रस्ता, शिवाजी रस्ता, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, काँग्रेस भवन, टिळक रस्ता यांसह शहराच्या इतर भागांतील पादचारी मार्गांचे रुंदीकरण  झाले आहे. तर नामदार गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता), सिंहगड रस्त्यासह अन्य काही ठिकाणचे काम सुरू आहे.  या मार्गांवर दुकानदार दुकानातील वस्तू ठेवतात. त्यांच्या दुचाकी पादचारी मार्गावर लागलेल्या दिसतात.

पथारीधारकांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेपेक्षा जास्त पादचारी मार्ग व्यापलेला आहे. त्यांच्याकडे येणारे ग्राहक वाटेत थांबत असल्याने इतरांना तेथून जाता येता येत नाही. अनेकादा धक्के मारत पादचारी मार्गावरून जावे लागते. पादचारी मार्गावर जागाच नसल्याने नागरिक थेट रस्त्यावरून चालतात. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. यातील बहुतांशी पथारी व्यावसायिक हे परवानाधारक असल्याने त्यांच्यावर पालिकेकडून कारवाईही केली जात नसल्याने त्यांना अभय मिळत आहे. 

गुन्हेगारांच्या आशीर्वादाने पथारी 
पथारी लावून व्यवसाय करण्यासाठी स्थानिक भाईंचा आशीर्वाद लागतो. त्याशिवाय व्यवसाय केला जात नाही. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर पथारी लावण्यास विरोध करणाऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. त्या वेळी पथारीचालक गुन्हेगारांना दिवसाला २५० रुपये देत असल्याचे समोर आले होते. आताही अशा प्रकारे अनेक बेकायदा पथारी व्यावसायिक पैसे देऊन व्यवसाय करत आहेत. अनेक जण दहशतीमुळे तक्रार देण्यास समोर येत नसल्याने या गुन्हेगारांचे फावत आहे.  

महापालिकेने जेवढी जागा दिली आहे, त्यापेक्षा जास्त जागा व्यापणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. त्यामध्ये सुरवातीला एक हजार रुपये दंड, दुसऱ्या कारवाईत पाच हजार रुपयांचा दंड आहे. तिसऱ्यांदा कारवाई झाली तर परवाना रद्द केला जाईल. जे दुकानादार बाहेर सामान ठेवत आहेत, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
- माधव जगताप, अतिक्रमण विभाग प्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com