#PMCIssue बेकायदा बांधकामे जिवावर

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जुनी बेकायदा बांधकामे टिकली, त्यावर पुन्हा मजले चढले, तरीही अशी बांधकामे ना महापालिका अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर आली, ना त्यांच्याकडून पाहणी करण्याचे धाडस झाले. परिणामी, शहरालगतच्या चारही बाजूंना आता बेकायदा इमारतींनी वेढल्याचे चित्र आहे. या बांधकामांचा दर्जाही सुमार असल्याने ती आता तेथील रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहे.

पुणे - जुनी बेकायदा बांधकामे टिकली, त्यावर पुन्हा मजले चढले, तरीही अशी बांधकामे ना महापालिका अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर आली, ना त्यांच्याकडून पाहणी करण्याचे धाडस झाले. परिणामी, शहरालगतच्या चारही बाजूंना आता बेकायदा इमारतींनी वेढल्याचे चित्र आहे. या बांधकामांचा दर्जाही सुमार असल्याने ती आता तेथील रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहे.

कारवाई चुकविण्याकरिता बांधकाम आटोपण्याची घाई, त्यामुळे त्याच्या दर्जाकडे साफ दुर्लक्ष करीत बांधकामे थाटली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळेच अशी बांधकामे रहिवाशांच्या जिवावर उठली आहेत. 

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांची प्रत्यक्ष स्थिती ‘सकाळ’ने जाणून घेतली, तेव्हा केवळ बांधकाम बेकायदा एवढाच मुद्दा नव्हे, तर या इमारती कशा जीवघेण्या झाल्या आहेत, हेही ठळकपणे समोर आले. वारजे- माळवाडी, उत्तमनगर, कोंढवे- धावढे, अतुलनगर, पॉप्युलरनगर आणि बावधनाच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात अशी बांधकामे उभारण्यात येत आहेत. कोंढवा खुर्द येथील शबाना मंजिल या पाच मजली इमारतीच्या पायावरील खांब खचल्याने ती धोकादायक झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. ही बाब कानावर येताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा इमारतच बेकायदा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या पार्श्‍वभूमीवर बेकायदा बांधकामांपाठोपाठ, वाढीव बांधकामे, त्यांचा दर्जा आणि त्यानंतर होणारी खरेदी-विक्री या बाबी चर्चेत आल्या आहेत. 

शहरातील बेकायदा बांधकामे रोखण्यात येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. प्रत्यक्षात मात्र, वस्तुस्थिती निराळीच आहे. उपनगरांत सर्रास कमीत-कमी जागेत अधिकाधिक बांधकामे थाटण्यात आल्याचे दिसून येत आहे. बांधकामाची तक्रार झाल्यास त्यावर हातोडा उगारला जाण्याच्या भीतीने संबंधित बांधकाम व्यावसायिक घाईगडबडीत बांधकामे करीत असल्याचे स्पष्ट झाले. 

कमी पैशांत फ्लॅट 
बांधकाम क्षेत्रातील मंदीचा फायदा घेऊन उपनगरांत छोट्या बांधकाम व्यावसायिकांनी आपले प्रस्थ वाढविण्यास सुरवात केली आहे. विनापरवाना बांधकामे करीत, कमीत-कमी पैशांत फ्लॅट विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अगदी सहजासहजी तेही बाजारभावापेक्षा कमी पैशांत फ्लॅट मिळत असल्याने लोकांचा खरेदीकडे ओढा आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम कायदेशीर आहे की नाही याची पाहणी करण्याची तसदी ते घेत नाहीत. त्यातून फ्लॅट खरेदी केल्यानंतर फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे.

महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांची पाहणी करून संबंधित मालकाला नोटीस बजाविण्यात येते. त्यानंतर बांधकामही पाडण्यात येते. शिवाय, परवानगीपेक्षा अधिक बांधकाम केल्याचे आढळून आल्यास त्यावरही कारवाई होते.
- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

Web Title: PMC Issue Illegal Construction Municipal