#PMCIssue पालिकेला लागेना सीसीटीव्हींचा शोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

शहराच्या सुरक्षिततेसाठी खासगी संस्था आणि व्यक्तींना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली आहे. त्याचे नियंत्रण पोलिस यंत्रणेकडे आहे. त्यात काही नगरसेवकांनी पुढाकार घेऊन कॅमेरे बसविले असून, त्याचा उपयोग होतो. 
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त 

पुणे - पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेत मागील चार वर्षांत साडेनऊ कोटी रुपये खर्च केले. परंतु या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्षाची यंत्रणाच महापालिकेकडे नाही. तरीही या वर्षी पुन्हा सुमारे अडीच कोटी रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्याचे नियोजन आहे. यातच शहरभरात कुठे आणि किती कॅमेरे आहेत, याची नोंदही महापालिकेकडे नाही.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांनी केले. त्याला प्रतिसाद देत महापालिकेनेही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याने तिची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय २०१३ मध्ये घेतला. त्यानुसार नगरसेवकांच्या सहयादीतून कॅमेऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. पहिल्या एक-दोन वर्षांत बहुतांशी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांत ही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. याच काळात देखभाल-दुरुस्तीअभावी ही यंत्रणा कोलमडल्याचे निदर्शनास आले. 

आता पुन्हा या वर्षी कॅमेरे खरेदीसाठी दोन कोटी ४० लाख रुपयांच्या निविदा मागविण्यात येणार आहे. परंतु महापालिकेकडे नियंत्रण कक्ष उभारण्याची योजना असूनही तिच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस ठाण्यांच्या परवानगीने उभारल्याने त्यांचे नियंत्रण पोलिसांकडे आहे, असे सांगत महापालिकेने पुन्हा हात झटकले आहेत. 

याविषयी महापालिकेचे अधीक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल म्हणाले, ‘‘पोलिसांची मागणी आणि ना हरकत पत्र घेऊन कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला जातो. त्यानंतर निविदा काढून उपयुक्ततेनुसार कॅमेरे घेण्यात येतात. त्याचे नियंत्रण संबंधित प्रभागांमधील पोलिस ठाण्यांकडे आहे. सध्या नेमकी किती कॅमेरे आहेत, याचे आकडे उपलब्ध नाहीत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Issue Municipal CCTV Search Police