#PMCIssue पीएमपी स्थानकांना अतिक्रमणांचा वेढा

PMC Issue
PMC Issue

पुणे - फेरीवाले, विक्रेते, रिक्षाचालक, खासगी गाड्यांचा बस स्थानकात खुला वावर... वेळापत्रकाचा अभाव...कचऱ्याचे ढीग... अस्वच्छता, दुर्गंधीचा सामना करीत प्रवाशांना स्थानकात बससाठी थांबावे लागत आहे. स्वारगेट व शिवाजीनगर स्थानकेही याला अपवाद नाहीत. याकडे परिवहन महामंडळ (पीएमपी) आणि महापालिका डोळेझाक करत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले.

पुणे स्थानक  
स्थानकाच्या आवारात फेरीवाले, रिक्षावाले आणि अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने दिसून येतात. त्यामुळे बसमध्ये चढणे प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना जिकिरीचे होते. स्थानक परिसरात बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. फेरीवाल्यांमुळे चालकाला बस मार्गावर नेताना अडचण येते. स्थानकाच्या आवारात कचऱ्याचे ढीग तर, सार्वजनिक स्वच्छतागृहात अस्वच्छता असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.

स्वारगेट बस स्थानक  
येथे बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची संख्या जास्त असते. मात्र, प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था येथेही दिसत नाही. बस स्थानकात प्रवाशांसाठी उभ्या केलेल्या शेडमध्येच फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. परिणामी चालकाला बस उभी करण्यासाठी कसरत करावी लागते. पाकिटमारीच्या घटना येथे नेहमीच घडतात. फेरीवाल्यांचे अतिक्रमण, कचरा येथेही दिसतो. रिक्षाचालकांचे अतिक्रमण थांब्यांसमोरच असते. 

शिवाजीनगर स्थानक  
येथील बसथांब्यांभोवतीही व्यावसायिक व फेरीवाल्यांनी अतिक्रमणे केली आहेत. बसथांबे तुटलेल्या अवस्थेत आहेत. चांगल्या बसथांब्यांमध्ये भिक्षेकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते. त्यातच खासगी वाहने बस थांब्यांभोवती कोंडाळे करतात. त्यामुळे बस दूरवर उभी राहते अन प्रवाशांना पळत जावे लागते. त्याचा ज्येष्ठ नागरिक, महिलांना त्रास होत असल्याचे चित्र आहे. या परिसरात वाहतूक पोलिस असतात, परंतु, त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही.

नागरिक म्हणतात... 
    प्रतापसिंह परदेशी - ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी पुणे स्थानकात कोठेही स्वतंत्र जागा नाही. पिण्याचे पाणी, प्रथमोपचाराची सोय नाही.
    अभय नागोशे - बस स्थानकात वेळापत्रक दिसत नाही. कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित माहिती मिळत नाही. 
    राजूसिंह पलामू - स्थानकातच रिक्षा, खासगी गाड्या थांबतात. त्यामुळे बरोबर ओझे असेल तर बाहेर जाण्यासाठी वेळ लागतो. 
    ज्योती कडभाने - महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहाच्या बाहेर महिला सुरक्षारक्षकाची गरज आहे. 

स्वारगेट, पुणे स्टेशनच्या आवारात प्रत्येकी दोन सुरक्षारक्षक आहेत. अतिक्रमणे काढण्यासाठी प्रत्येकी चार सुरक्षारक्षकांचे पथक नियुक्त केले आहे. अनधिकृत फेरीवाले, विक्रेते, भिक्षेकऱ्यांवर कारवाई सुरू आहे. शिवाजीनगरसाठी सुरक्षारक्षक नाहीत. मनुष्यबळ कमी असल्यामुळे नियमितपणे कारवाईस मर्यादा येतात. 
- अविनाश डोंगरे, मुख्य सुरक्षा अधिकारी, पीएमपी

बस स्थानकांभोवतालच्या अतिक्रमणांवर वेळोवेळी कारवाई होते. त्यानंतर पुन्हा अतिक्रमणे होतात. परंतु, पुन्हा कारवाई करून अतिक्रमणे हटविली जातील. 
- माधव जगताप, अतिक्रमण विभागप्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com