Pune-Municipal
Pune-Municipal

#PMCIssue सत्ताधाऱ्यांच्या वादात पावसाळी कामांवर पाणी

पुणे - पावसाळी गटारांची कामे विशिष्ट ठेकेदाराच्या हातात देण्यावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पावसाळी कामांची योजना गाळात जाण्याची चिन्हे आहेत.

शहरात तब्बल दोन हजार किलोमीटर लांबीची पावसाळी गटारे बांधण्याचा सल्ला महापालिकेला देण्यात आला होता. गेल्या दहा वर्षांत जेमतेम पाचशेच किलोमीटर लांबीची गटारे बांधण्यात आली. आता काही भागांत ही गटारे बांधण्याला मुहूर्त सापडला आहे. मात्र निविदेवरून महापालिकेतील भाजपचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आणि शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. ‘मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याला आक्षेप घेतल्याने सभागृह नेत्यांची सटकली तेव्हा, नेत्याने आपल्याच पक्षाच्या नगरसेवकाला सुनावले. वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असलेल्या नगरसेवकानेही नेत्याच्या मनमानीला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. दोघा नेत्यांच्या वादात योजनेचे काय होणार असा प्रश्‍न आहे. 

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबत असल्याने ते वाहून नेण्यासाठी गटारे बांधण्याचा सल्ला २००८ मध्ये प्रायमो या सल्लागार कंपनीने दिला. २३ भागांत गटारांची आवश्‍यकता असल्याचा अहवाल आहे. पावसाळ्यात गेल्या चार-पाच वर्षांत रस्त्यांवर पाणी साचत असल्याचे आढळून आले आहे. तीन वर्षांपासून उपनगरांसह मध्यवर्ती भागांतील रस्ते पाण्याखाली दिसेनासे झाले होते. गटारे नसल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले होते. त्यामुळे पावासाळी गटारांच्या कामांना सुरवात केल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सात परिसरांमध्ये गटरांची कामे करण्याचा निर्णय झाला आणि त्याकरिता ८० कोटींची तरतूदही करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने रस्त्यांवर पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. त्याचा परिणाम म्हणजे, पावसाळी गटरांच्या कामांना कोणी हातही लावला नाही. त्याचा निधी अन्य कामांसाठी पळविला. अर्थसंकल्पातील कामे दाखविण्याच्या नावाखाली आता कुठे निविदा काढण्याला सुरवात झाली असली तरी, नेत्यांमधील हव्यासापोटी त्या कागदावरच राहण्याची शक्‍यता आहे.

जुनी गटारे गायब 
शहराच्या विविध भागांत सध्या पाचशे किलोमीटर लांबीची गटारे आहेत. उन्हाळ्यात त्यांची साफसफाई करून पावसाळ्यात पाणी वाहून जाईल, या पद्धतीने गटारांचे नियोजन करणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत केवळ साफसफाईसाठीच कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र ती कामे होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे गाळातच ही गटारे गायब झाली आहेत.

सद्यःस्थिती
शहराचे क्षेत्रफळ - ३३० चौ.कि.मी.
रस्ते - २००० कि.मी.
सांडपाणी वाहून जाण्याचे अंतर - २ हजार कि.मी. 
पावसाळी गटारांची गरज असलेले क्षेत्र - २ हजार किलोमीटर 
प्रत्यक्षात गटारे - ५०० कि.मी.

पावसाळी गटारांची कामे एकाच टप्प्यात करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकच ठेकेदार नेमला जाणार आहे. त्याबाबत काही सूचना आल्या होत्या. त्यावर चर्चा झाली आहे; परंतु काही वाद नाहीत.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते, महापालिका

पावसाळी गटारांची आवश्‍यकता लक्षात घेता ती वेगाने व्हावीत, यासाठी काही सूचना केल्या आहेत आणि प्रशासनाशी चर्चाही झाली आहे.
- सुशील मेंगडे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com