#PmcIssue कोट्यवधी रुपये पाण्यात

संदीप जगदाळे 
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पावसामुळे उपनगरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. डांबर उखडले गेल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.

हडपसर - पावसामुळे उपनगरांतील रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. डांबर उखडले गेल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.

उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरून वाहनधारकांना जाताना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. देशातील १०० स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट झालेल्या पुणे शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी महापालिका स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. मात्र सोलापूर रस्ता, महंमदवाडी रस्ता, काळेपडळ भागातील रस्ते, वानवडीतील रस्ते पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यात वाहने घसरून अपघात होण्याची शक्‍यता आहे.

या परिसरात पंधरा दिवसांपूर्वीच रस्त्यावर तात्पुरते डांबरीकरण करण्यात आले होते. तसेच, खड्डे बुजविले होते. मात्र, या पावसामुळे डांबरीकरण उखडून गेले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना करून हे जीवघेणे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

काही भागांत महापालिकेने कच्चा मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून वाहने घसरू लागली आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांतून जाताना अंदाज न आल्यानेही अपघात घडत आहेत. यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करायला हव्यात.
- संजय होले, नागरिक 

पावसापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती केली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्न करीत आहे.
- संजय गावडे, सहायक आयुक्त, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pmc Issue road hole rain loss