#PMCIssue बेपर्वाईचा कळस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

इथे फुटल्या जलवाहिन्या

  • दत्त मंदिर चौक, विमाननगर
  • गोसावीवस्‍ती, हॅप्पी कॉलनी, कोथरूड
  • बाजीराव रस्‍ता
  • राजीव गांधी पूल, औंध
  • शनिवार पेठ

पुणे/वडगाव शेरी - एकीकडे पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले असताना दुसरीकडे मात्र शहरात जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. शुक्रवारी विमाननगर, शनिवार पेठ, बाजीराव रस्ता, कोथरुड आदी भागांत अशा घटना घडल्या. महापालिका कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वारंवार या घटना घडत असल्याने पुणेकर तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.  

विमाननगर येथे दत्त मंदिर चौकात पहाटे पाचच्या सुमारास चारशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. तब्बल दोन तास पाण्याचा उंचच्या उंच फवारा सुरू होता. त्यामुळे परिसरात पावसाळ्याप्रमाणे रस्त्यावरून पाणी वाहत होते. काही सोसायट्यांमध्येसुद्धा पाणी शिरले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर वाहिनीचा पुरवठा बंद करून दुरुस्तीला सुरवात करण्यात आली. या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद होता.

शुक्रवारी कमी दाबाने पुरवठा होता. त्यातच आज जलवाहिनी फुटल्याने नागरिकांचे पाण्यावाचून हाल झाले. अनेकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागले.

शनिवार पेठ आणि बाजीराव रस्त्यावरील अत्रे सभागृहाजवळही जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले.

औंध येथील राजीव गांधी पुलाजवळ चालू असलेल्या खोदकामामुळे पाण्याची वाहिनी तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी काम करत असलेल्या जेसीबीच्या धक्‍क्‍याने वाहिनी तुटल्याने या भागात काल रात्री अक्षरशः पाण्याचे कारंजे उडत होते. 

ज्या ठिकाणी जलवाहिनी कमकुवत असेल, त्या ठिकाणावरून हवेच्या दाबामुळे कधी कधी पाण्याची गळती होते किंवा जलवाहिनी फुटते. गुरुवारी पाणीपुरवठा बंद असल्याने या ठिकाणी जलवाहिनीत हवेचा दाब निर्माण झाला होता. तातडीने या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाईल. 
- पंढरीनाथ तांबारे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMC Issue Water Leakage Water Shortage