PMCIssues : तब्बल 132 कोटींच्या सांडपाणी वाहिन्या आहेत कुठे?

PMC-Issues
PMC-Issues

नोंद ४२ किमीची; प्रत्यक्ष खोदाई ५ किमी
पुणे - शहरात वर्षभरात १३२ कोटी रुपये खर्चून ४२ किलोमीटर लांबीच्या जुन्या सांडपाणी वाहिन्या बदलून त्या नव्याने टाकल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. मात्र, पथ विभागाकडे जेमतेम पाच किलोमीटरच खोदाई झाल्याची माहिती आहे. यामुळे नव्या वाहिन्या टाकल्या, की न टाकताच त्यांची बिले काढली, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.

महापालिकेचा बहुतांशी कारभार सांभाळणाऱ्या आणि २५ लाखांपर्यंतच्या कामांची अंमलबजावणी करणाऱ्या एकाही क्षेत्रीय कार्यालयाकडे या कामांच्या नोंदी नाहीत. शहरात सांडपाणी सुमारे ७५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) निर्माण होते. या वाहिन्या खराब झाल्याचे दाखवून नगरसेवकांसह अधिकारी त्या बदलण्यास प्राधान्य देतात. एकदा टाकलेल्या वाहिन्या किमान १२ वर्षे बदलण्याची आवश्‍यकता नसल्याचा महापालिकेचा अभिप्राय आहे. तरीही, दोन-तीन वर्षांनी वाहिन्यांची कामे होत असल्याचे नगरसेवकांच्या सहयादीवरून स्पष्ट होते. त्यात जुन्या वाहिन्या काढून नव्याने टाकण्याबाबतचे प्रस्ताव दिले जातात. त्यातही खर्चिक बाब म्हणून वाहिन्यांतील चेंबर नव्याने करण्याचा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते.

सांडपाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीवर पाच वर्षांत १०० कोटी रुपये खर्च केल्यानंतरही १ हजार ८०० किलोमीटरपैकी ७०० किलोमीटर लांबीच्या वाहिन्या तुंबल्याचे महापालिका प्रशासन सांगते. त्यामुळे वाहिन्यांची कामे कशी होतात, ती कधी केली जातात, नव्या कामांची आवश्‍यकता आहे का? याच्या नोंदी पाहिल्या. त्या वेळी वाहिन्यांची मंजुरी, त्यावरील खर्च आणि प्रत्यक्ष खोदाईची परवानगी यांच्या नोंदीतील गोंधळ उघड झाला. ही वस्तुस्थिती अधिकाऱ्यांनीही मान्य केली आणि नोंदी तपासण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना दिला. 

पाहणीच्या नोंदीतच तफावत 
क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कामांची पाहणी आणि ऑडिट कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. त्यानुसार अभिप्राय आल्यानंतरच बिले काढण्यात येतात. परंतु, या पाहणीच्या नोंदीतच तफावत असल्याचे काही नगरसेवक सांगत आहेत.  

वाहिन्या अपुऱ्या ठरत असल्याचे दाखवून वाहिन्यांचा आकार वाढविल्याची उदाहारणे आहेत. त्याच वेळी वाहिन्यातील चेंबरच्या बांधणीसाठी किमान एक ते आठ हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत आहेत. परंतु, हाच खर्च १५ ते ४५ हजार रुपयांपर्यंत दाखविला जातो.

खोदाईसाठी पथ विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यात सर्व प्रकारच्या सेवा वाहिन्यांचा समावेश आहे. मात्र, या वर्षात सांडपाणी वाहिन्यांच्या खोदाईसाठी तीन किलोमीटर इतकीच परवानगी दिली आहे. 
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका

सांडपाणी वाहिन्या बदलण्याच्या प्रस्तावांना अभिप्राय दिला असून, त्यात गरजेनुसार कामे करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर कामांचा अहवाल मागविला आहे.
- संदीप खांदवे, कार्यकारी अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com