#PMCIssue झाडाला पैसे!

#PMCIssue झाडाला पैसे!

पुणे - वृक्षगणनेसाठी नऊ कोटी रुपये मोजूनही शहरात नेमकी किती झाडे आहेत, याची आकडेवारी सव्वा वर्षानंतरही महापालिकेला कळू शकलेली नाही. ठेकेदार संस्थेकडून हे काम संथ गतीने सुरू असून, आतापर्यंत झालेल्या कामाचा अहवालही वृक्ष प्राधिकरण समितीकडे नाही. त्यामुळे एवढी रक्कम मोजूनही झाडांची गणना होऊ शकली नसली, तरी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मात्र ‘झाडाला पैसे’ या उक्तीचा खऱ्या अर्थाने अनुभव घेत आहेत, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे.      

वृक्षगणनेसाठी पहिल्यांदाच जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम (जीआयएस) आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहेत. त्यासाठी ‘सार’ या खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, तिचे काम २०१६ पासून सुरू आहे. त्यातून मार्च २०१८ पर्यंत २६ लाख ७७ हजार झाडांचा शोध लागला. मात्र त्यानंतर गेल्या वर्षभरात नेमके किती काम झाले, हे प्राधिकरणाच्या सदस्यांनाही कळायला मार्ग नाही. प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत संस्थेच्या कामाचा अहवाल येईल, इतकेच उत्तर महापालिका आणि प्राधिकरणाचे पदाधिकारी देत आहेत. दरम्यान, झाडांच्या पाहणीबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी ‘सार’च्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

शहरात २०१२ च्या वृक्षगणनेनुसार ३८ लाख ६० हजार झाडे होती. मात्र वाढत्या नागरीकरणाचा परिणाम हरित पट्ट्यावर होत आहे. परिणामी, झाडे नाहीशी होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्षगणना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यात झाडांची अचूक माहिती, त्याचे छायाचित्रे, स्थानिक, शास्त्रीय नाव, त्याची उंची, खोडाचा घेर याची पाहणी करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता एका झाडापोटी महापालिकेने २२ रुपये मोजले आहेत. 

ही वृक्षगणना महागडी असल्याने सुरवातीला तिला विरोध झाला; मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्वत:च्या हट्‌टापायी हे काम रेटले आणि संस्थेला दिले. हे काम वेळेत पूर्ण होईल, असे चित्र रंगविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र सव्वा वर्षापासून काम संथ गतीने सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या सदस्यांनी सांगितले. 

प्राधिकरणाचे सदस्य आदित्य माळवे म्हणाले, ‘‘तज्ज्ञ संस्थेमार्फत झाडांची मोजणी करण्यात येत आहे. या कामाचा पहिल्या टप्प्यातील अहवाल आला आहे. मात्र उर्वरित अहवाल पुढील बैठकीत मिळेल, असे सांगण्यात आले आहे.’’

झाडांची संख्या खरी की खोटी?
शहरात नेमकी किती झाडे आहेत, हे उद्यान विभागासह प्राधिकरणावर नेमणूक असलेल्या एकाही अधिकाऱ्याला माहिती नाही. त्यामुळे जुन्या वृक्षगणनेचे आकडे मांडून सध्या काम सुरू आहे. त्यात लाखो रुपये जादा गेल्याचा संशय प्राधिकरणाचे सदस्य व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण अहवालासह उद्यान खात्याकडील झाडांची संख्या खरी की खोटी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com