दादा, भाऊ की बाळासाहेब! 

दादा, भाऊ की बाळासाहेब! 

आगामी निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून राज्यभर तयारी करून कार्यकर्त्यांना "चार्ज' करण्यात आले. दुसरीकडे कॉंग्रेसने जिल्हावार बैठका घेऊन आपल्या शक्तीची चाचपणी केली, तर पश्‍चिम महाराष्ट्र हा बालेकिल्ला असणाऱ्या राष्ट्रवादीने "हल्लाबोल' करीत वातावरण निर्मिती केली आहे. या आंदोलनाचा समारोप पुण्यातच होणार आहे. त्यामुळे या पुढचा कालावधी हा राजकीय पक्षांच्या वेगवान घडामोडींचा असेल, हे नक्की. पुण्यात लोकसभेची लढत आतापर्यंत प्रामुख्याने भाजप-कॉंग्रेस यांच्यात झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या हालचाली काय असणार याबाबत पुणेकरांना उत्सुकता आहे. कॉंग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा चेहरा कोण, यालाही तितकेच महत्त्व असेल. 

नरेंद्र मोदी यांच्या लाटेत देशभरात कॉंग्रेसचे अनेक गड कोसळले. पुण्यात तर कधी नव्हे एवढ्या मताधिक्‍याने कॉंग्रेसचा पराभव झाला. या पराभवानंतर पक्ष एवढा खचला की, पुढील विधानसभा आणि सव्वा वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही कॉंग्रेसला सावरता आले नाही. गेल्या काही दिवसांत पक्षाची स्थिती सुधारली आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या सर्व पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने पुण्यातील पक्षाचे पदाधिकारी, इच्छुकांसोबत मुंबईत बैठक घेतली. पक्षाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची चाचपणी करतानाच, राष्ट्रवादीशी आघाडी झाली तर काय होईल, याचाही अंदाज घेतला. गेल्या लोकसभा निवडणुकीत युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली; पण पक्षातील प्रस्थापितांनीच त्यांच्या नेतृत्वाला प्रतिसाद दिला नाही. गेली चार वर्षे शहर कॉंग्रेसचे नेतृत्व कदम यांनी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यालाही यश आले नाही. आता ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने राजकीय समीकरणे बदलली आहेत. विश्‍वजित हे पतंगराव कदम यांची विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील अशी शक्‍यता आहे. त्यामुळे ते पुण्यात राहणार की सांगलीला जाणार यावरही पुण्यातील लोकसभेच्या जागेचे चित्र ठरणार आहे. पक्षनेतृत्वाने तर विश्‍वजित यांनी सांगलीत नेतृत्व करावे, असा सल्ला दिल्याचे समजते. तसे झाले तर पुन्हा सक्षम उमेदवाराची शोधाशोध करावी लागणार आहे. 

सध्यातरी विश्‍वजित कदम यांच्यासोबतच माजी आमदार मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार अनंत गाडगीळ अशी इच्छुकांची मोठी संख्या आहे; पण गेल्या काही वर्षांत शहरी मतदारांचे बदललेले स्वरूप, तरुण मतदारांची वाढलेली संख्या, भाजपचे शहरातील वाढलेले वर्चस्व या सर्व पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसला सर्वसमावेशक चेहऱ्याला संधी द्यावी लागणार आहे. मुंबईतल्या बैठकीत इच्छुकांकडूनच मतदारसंघाच्या सर्वेक्षणासाठी निधी मागितल्याची कुजबूज आहे. जिल्ह्यातील एका माजी मंत्र्यांचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून परत मिळविण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघच राष्ट्रवादीला द्यावा, अशी भन्नाट "आयडिया'ही समोर आली आहे. एकूणच पुण्यात कॉंग्रेसला कार्यकर्ता बांधणीपासून, मतदारसंघ टिकवणे, सक्षम उमेदवार अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. कार्यकर्त्यांचा भक्कम पाया असणारी पुण्यातील कॉंग्रेस सक्षम नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष यामुळे ढेपाळली आहे. आगामी लोकसभेच्या निमित्ताने ती कात टाकणार की, पराभूत मानसिकतेच्या जाळ्यातच अडकणार हे लवकरच समजेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com