कमळ फुलणार की बाण सुसाट सुटणार?

उमेश शेळके
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

एक-दोन अपवाद वगळता सर्वच पक्षांनी नव्या चेहऱ्यांना दिलेली संधी आणि दोन्ही काँग्रेसला बंडखोरी रोखण्यात आलेले अपयश यामुळे खडकमाळ आळी- महात्मा फुले पेठ या प्रभाग १८ मधील निवडणुकीत रंगत भरली आहे. बंडखोरीचा फायदा होऊन कमळ फुलणार की या भांडणात बाण सुसाट सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक-दोन अपवाद वगळता सर्वच पक्षांनी नव्या चेहऱ्यांना दिलेली संधी आणि दोन्ही काँग्रेसला बंडखोरी रोखण्यात आलेले अपयश यामुळे खडकमाळ आळी- महात्मा फुले पेठ या प्रभाग १८ मधील निवडणुकीत रंगत भरली आहे. बंडखोरीचा फायदा होऊन कमळ फुलणार की या भांडणात बाण सुसाट सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहराच्या मध्यवर्ती आणि पेठांचा हा प्रभाग आहे. दोन मनपा कॉलनी, एक पीएमपी कर्मचाऱ्यांची कॉलनी आणि दोन पोलिस लाइन असलेल्या या प्रभागात अठरापगड जातीचे मतदार आहेत. पूर्वीपासून काँग्रेसला मानणारा हा भाग आहे. या प्रभागात सर्वच पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी होती. तब्बल १२९ उमेदवार इच्छुक होते. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी ऐनवेळी पक्षबदल केला. त्यातून सगळ्याच पक्षाच्या निष्ठावंतामध्ये नाराजीचा सूर उमटला असून, ही नाराजी कोणाच्या पथ्यावर पडणार हा कळीचा मुद्दा आहे.

आघाडीत हा प्रभाग काँग्रेसकडे आल्याने राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना त्याचा फटका बसला. काँग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने अनेक मान्यवर दुखावले. त्यातून दोन्ही काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. ती थोपविण्यात दोन्ही काँग्रेसला काही प्रमाणात यश आले, तरी अनेकांनी उमेदवारी कायम ठेवत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकला आहे. बंडखोरांनी एकत्र येत स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने त्यांचे हे आव्हान काँग्रेस कसे पेलणार, याचा फायदा भाजप घेणार की या वादात बाण सुसाट सुटणार हा औत्सुक्‍याचा विषय आहे.

काँग्रेसकडून माजी महापौर कमल व्यवहारे, मिलिंद काची यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी सीमा काची, आयुब पठाण आणि शारदा पाटोळे; भाजपचे विद्यमान नगरसेवक विष्णू हरिहर यांच्या वहिनी विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, अजय खेडेकर आणि आरती कोंढरे; शिवसेनेकडून मेघा पवार यांच्यासह बाळासाहेब मालुसरे, सदाफ धोटेकर आणि संदीप पेटाडे, तर मनसेकडून कलावती तुपसुंदर, ज्योती खुटवड, आशिष साबळे आणि नगरसेविका सुशीला नेटके नशीब अजमावत आहेत. यांच्याशिवाय नारायण चव्हाण, डॉ. गणेश परदेशी, राजा तुंगतकर, नीलेश बराटे यांच्या पत्नी भावना बराटे यांच्यासह डझनभर इच्छुक बंडाचा झेंडा घेऊन रिंगणात उतरले आहेत.

Web Title: pmc prabhag18