कचऱ्याच्या दुर्गंधीतून पैशाचा सुगंध

ज्ञानेश सावंत 
रविवार, 17 मार्च 2019

उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील कचरा डेपो दुर्गंधीमुक्त व्हावा म्हणून, औषधफवारणी करीत महापालिकेचे अधिकारी कचऱ्यातून स्वत:साठी पैशांची निर्मिती करीत असल्याचे समोर आले आहे. 

पुणे : उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील कचरा डेपो दुर्गंधीमुक्त व्हावा म्हणून, औषधफवारणी करीत महापालिकेचे अधिकारी कचऱ्यातून स्वत:साठी पैशांची निर्मिती करीत असल्याचे समोर आले आहे. या डेपोतील दुर्गंधीमुळे जीव गुदमरत असतानाच रोज सुमारे 30 हजार रुपयांची औषधफवारणी केल्याचा हिशेब कागदोपत्री दाखविण्यात येत आहे. मागील पाच वर्षांपासून अशाप्रकारे कचरा डेपोवर पैशांची फवारणी होत आहे.

या कामासाठी ठेकेदार नेमून अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत सुमारे अडीच कोटी रुपयांची उधळपट्टी केली आहे. कोणत्या प्रकारच्या औधषांची फवारणी होते, त्याची परिणामकारकता आणि ही कामे कधी होतात, हे डेपोच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या प्रमुख कर्मचाऱ्यांनाही सांगता आले नाही. ही कामे वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे होतात, इतकेच मोजके उत्तर देऊन त्यांनी बोलणे टाळले. कचरा प्रकल्प उभारून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी पैशांची विल्हेवाट लावत आहेत का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
 
ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच तो डेपोत टाकण्यात येतो. मात्र, काही प्रमाणात मिश्र कचरा असतो. त्यामुळे डेपो आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याती तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. या तक्रारीनंतर घनकचरा व व्यवस्थापन विभागाने लोकांचे आरोग्य धोक्‍यात आल्याचे दाखवून औषधफवारणीचा उपाय शोधला. यासाठी वर्षाकाठी लाखो रुपयांची तरतूद केली. नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी मर्जीतील ठेकेदरांना काम दिले. त्यातून सध्या रोज सरासरी 28 ते 30 हजार रुपये औषधेफवारणीच्या नावाखाली खर्च होत असल्याचे आतापर्यंतच्या नोंदीवरून उघड आले आहे. 

मिश्र कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा -
डेपोत ओला आणि सुका कचरा एकत्र येत असल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. प्रत्यक्षात मात्र कचरा वर्गीकरणासाठी महापालिका मोठ्या प्रमाणात काम करीत असल्याचे सांगते. त्यामुळे मिश्र कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचाही घनकचरा व्यवस्थापन विभागाचा दावा आहे. असे असूनही डेपोत दुर्गंधी पसरत असल्याचे सांगत औषधफवारणी करावी लागत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. 

कचरा डेपो आणि परिसरात दुर्गंधीमुळे औषधफवारणी करण्यात येते. ती नियमितपणे केली जात असल्याने परिसरात स्वच्छता राखता येते. या कामासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली आहे. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका 

  • कचऱ्याचे प्रमाण (दररोज) - 1 हजार 600 टन
  • डेपोत टाकण्यात येणारा कचरा - 900 टन 
  • डेपोचा परिसर - 163 एकर 
  • सध्या वापर - 50 एकर 
  • औष फवारणीसाठी तरतूद 97 लाख 40 हजार रुपये 
Web Title: PMC spent thirty thousand daily medicines for reducing smell Garbage odor