पाणीपुरवठ्याची निविदा २२५ कोटींनी फुगविली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

पुणे- शहराला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाच्या निविदेत महापालिका आयुक्तांनी सर्वसाधारण समितीची मान्यता न घेताच सुमारे २२६ कोटी रुपयांची कामे वाढविली आहेत, अशी तक्रार सजग नागरिक मंचने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी केली. 

शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने १७१८ कोटी १६ लाख रुपयांची निविदा मागविली होती. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ती मंजूर केली. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करताना निविदांप्रमाणेच कार्यवाही होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या निविदेमध्ये ‘ऑप्टिकल फायबर केबल डक्‍ट’साठी २२५ कोटी ९८ लाख रुपयांच्या खर्चाचा समावेश केला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने त्यावर आक्षेप घेतला होता. 

प्रकल्प अहवालाच्या मंजुरीपेक्षा हा खर्च जास्त आहे, त्यामुळे महापालिका कायद्यानुसार एस्टिमेंट कमिटी आणि सर्वसाधारण सभेची त्याला मंजुरी घ्यायला हवी, असे पाणीपुरवठा विभागाने महापालिकेला कळविले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आयुक्तांनी वाढीव खर्चाच्या निविदा मागविण्याचा आदेश दिला आहे. महापालिका आयुक्तच कायद्याचे उल्लंघन करीत असून, एका कंपनीच्या फायद्यासाठी हा खटाटोप चालला आहे का, असा संशय येत असल्याचे सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्‍वास सहस्रबुद्धे यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच, वाढीव खर्चाच्या निविदेची चौकशी करून त्या रद्द कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.  

Web Title: PMC water tener issue