‘पीएमओ’ने दिला आजींना आधार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

प्रभा पांडे यांच्या आधार कार्डचे काम मार्गी

पुणे - निवृत्तिवेतन हवे असल्यास आधार कार्ड अनिवार्य आहे. वर्तमानपत्रांतील ही बातमी वाचून प्रभा वसंत पांडे या नव्वद वर्षांच्या आजी नाराज झाल्या. मात्र त्यांचा हा प्रश्‍न पंतप्रधान कार्यालयाने सोडविला.

‘पीएमओ’च्या पोर्टलवरील ‘ग्रिव्हन्स सेल’ला आजींची परिस्थिती पांडे कुटुंबीयांनी कळविली, तेव्हा ‘पीएमओ’कडून दोन-तीन मिनिटांत मेलवर उत्तर आले आणि अवघ्या सहा-सात दिवसांत आधार कार्डच्या कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली.  

शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत पांडे आजी त्यांच्या मुलाकडे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा जयंत व सून अर्चना दोघेही वकील आहेत. आजींचे यजमान वसंत श्रीधर पांडे हे निवृत्त न्यायाधीश होते. त्यांचे २००६ मध्ये निधन झाले. तेव्हापासून सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (मॉडेल कॉलनी शाखा) येथे आजींच्या नावे निवृत्तिवेतन जमा होते. वयपरत्वे त्यांना दगदग सहन होत नसल्याने त्या घरीच असतात. पण, निवृत्तिवेतन मिळण्यासाठी काय करावे या विवंचनेत त्या होत्या. तेव्हा त्यांच्या सुनेने पंतप्रधानांच्या पोर्टलवरील ‘ग्रिव्हन सेल’ला आजींची माहिती पाठविली व मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.  

‘पीएमओ’कडून त्यांना तत्काळ प्रतिसाद मिळाला. आधार कार्डसाठीचा संदर्भ क्रमांक आला. १७ मार्चला एसएमएस आणि ई-मेलही आला. पीएमओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या मेलमध्ये नेटवर्क पीपल्स सर्व्हिसचे किरण घुले यांचा दूरध्वनी क्रमांक पांडे यांना कळविला होता. त्यावर अर्चना यांनी संपर्क साधून घरचा पत्ता दिला. ‘आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येतील,’ असे उत्तर त्यांच्याकडून आले. कर्मचारी हनुमंत झोंबाडे व अक्षय मिसाळ यांनी पांडे यांच्या घरी जाऊन आधारकार्डसाठीची प्रक्रिया पूर्ण केली, तेव्हा आजीही खूष झाल्या. 

‘‘आम्ही तिघे तुझे आधार आहोत. तुला कशाला आधारकार्ड पाहिजे, असे माझी तिन्ही मुले मला गमतीने म्हणायची. माझ्याकडे आधारकार्ड नाही म्हणून मी काळजीत होते. पण, मुलांनी दिल्लीला कळविले आणि आधारकार्डसाठीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. अनेक ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र व्यवस्था केल्यास त्यांनाही आधारकार्ड मिळेल,’’ अशी अपेक्षा प्रभा पांडे यांनी व्यक्त केली. 

सरकारमान्य एजन्सीकडून आधार कार्ड काढता येते. मात्र त्यासाठी कर्मचाऱ्यांना एका आधार कार्डमागे फक्त २५ रुपये मिळतात. आजींचे वय लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या घरी जाऊन आधार कार्डची प्रक्रिया पूर्ण केली. पुढील १५ दिवसांत त्यांना इंटरनेटवर आधार कार्ड उपलब्ध होईल. टपालाद्वारे तीन महिन्यांनी त्यांच्या घरी आधार कार्ड पोचेल. 
- हनुमंत झोंबाडे, कर्मचारी, नेटवर्क पीपल्स सर्व्हिस 

Web Title: pmo support to old woman