पीएमपीचे ब्रेकफेल वाढले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

देखभाल दुरुस्तीबाबत चालढकल
पावसाळ्यात देभखाल दुरुस्तीच्या कामांकडे विशेष लक्ष दिले जाते, असा दावा पीएमपी प्रशासन करीत असले तरी, स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार देखभाल दुरुस्तीबाबत चालढकल केली जाते. त्यामुळे ब्रेकफेलचे प्रमाण वाढते आणि बस नादुरुस्त होतात. ब्रेकफेलमध्ये ठेकेदारांच्या बसचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नव्याने दाखल झालेल्या बसची देखभाल दुरुस्ती संबंधित कंपन्यांकडे आहे; तसेच सुट्या भागांसाठी आता पीएमपीमध्येच उत्पादक कंपन्यांनी भांडार उघडले आहे, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले.

पुणे - शहरात वाढलेल्या पर्जन्यमानाचा फटका पीएमपीच्या बसलाही बसला आहे. पावसामुळे ब्रेकफेलचे प्रमाण वाढले; तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तब्बल ५ हजारांपेक्षा जास्त बस नादुरुस्त झाल्या. पाऊस आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे ब्रेकफेलची संख्या वाढत असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

शहरात यंदा जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने कहर केला होता. पावसामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण होतात. त्यात पाणी साठलेले असते. त्याचा चालकांना अंदाज येत नाही. परिणामी, खड्ड्यांत बस आदळतात. त्यामुळे इंजिनचे काही भाग तसेच वायरिंग लूज होणे, बसमधील फर्निचर खिळखिळे होणे आदी प्रकार घडतात.

पावसात वायपर अपेक्षित वेगाने काम करीत नसल्यामुळेही बसचा वेग मंदावतो; तसेच इंजिनच्या काही भागांत पाणी जाते. त्यामुळेही बसचे इंजिन काही वेळा उतरवावे लागते. परिणामी, देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेळ लागतो; तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांचीही संख्या अपुरी आहे. त्याचाही परिणाम बसवर होतो, असे पीएमपीच्या प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. ब्रेकफेलचे प्रमाण वाढल्यावर त्याचा थेट फटका प्रवाशांना बसत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

सुमारे ४ हजार ब्रेकफेलची एरवीची सरासरी
मे - ४९२०
जून - ४८९३
जुलै - ५६२७
ऑगस्ट - ५४०८
सप्टेंबर - ४६४२
सुमारे १० लाख ५० हजार पीएमपी प्रवाशांची सरासरी

पावसामुळे अनेकदा बसमध्ये तांत्रिक बिघाड होतात. त्यासाठी देखभाल दुरुस्ती वेळेवर केली जाते. उलट या काळात विशेष लक्ष दिले जाते. त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना एरवी; तसेच पावसाळ्यापूर्वीही नियमितपणे दिल्या जातात. 
- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

पीएमपीच्या बसची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नाही, हेच खरे दुखणे आहे. पावसाळा लक्षात घेऊन पूर्वनियोजन करायला हवे; परंतु त्याकडेच दुर्लक्ष होते. ठेकेदार बसची दुरुस्ती करीत नाही, असे म्हणून प्रशासन हात वर कसे करू शकते? 
- जुगल राठी, पीएमपी प्रवासी मंच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP Bus Break Fail Percentage Increase