जेव्हा पीएमपी बंद पडते...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य पर्याय म्हणून पीएमपीएमएल बससेवेकडे पहिले जाते. परंतु, सध्या ही यंत्रणा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. शहरातील काही प्रवाशांनी नुकतीच त्याची अनुभूती घेतली. रात्रीची (८.३५) शेवटची पुणे मनपा बस स्थानकांवरून घरकुल वसाहतीकडे निघालेली पीएमपी बस अचानकपणे दापोडी येथे बंद पडली. ही बस पुढे जाऊ शकणार नाही, असे सांगत वाहक व चालकाने आपापली जबाबदारी झटकली. दुसऱ्या बसचा पर्याय उपलब्ध करून देण्याची साधी तसदीही घेतली नाही.

पिंपरी - सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य पर्याय म्हणून पीएमपीएमएल बससेवेकडे पहिले जाते. परंतु, सध्या ही यंत्रणा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. शहरातील काही प्रवाशांनी नुकतीच त्याची अनुभूती घेतली. रात्रीची (८.३५) शेवटची पुणे मनपा बस स्थानकांवरून घरकुल वसाहतीकडे निघालेली पीएमपी बस अचानकपणे दापोडी येथे बंद पडली. ही बस पुढे जाऊ शकणार नाही, असे सांगत वाहक व चालकाने आपापली जबाबदारी झटकली. दुसऱ्या बसचा पर्याय उपलब्ध करून देण्याची साधी तसदीही घेतली नाही. नागरिकांनी मजलदरमजल करत आपले घर गाठलेही. पण, पीएमपी बस सेवेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. 

या मार्गावरील सी २७८ ही बस यापूर्वीही कित्येकदा रस्त्यातच बंद पडली आहे. त्या दिवशीही बस बंद पडल्यानंतर महिला प्रवाशांनी दुसरी बस उपलब्ध करून द्या, अशी भूमिका घेतली. चालकाने प्रयत्नपूर्वक ती कशीबशी सुरू केली. परंतु, थोडे अंतर गेल्यानंतर ती पुन्हा बंद पडली. त्यानंतरही वारंवार असे घडले.

अखेरीस भोसरी एमआयडीसी परिसरात ती पूर्णतः: नादुरुस्त झाली. येथून नेहरूनगर डेपो जवळ असतानाही चालक-वाहकाने दुसरी बस उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली. मात्र, प्रवाशांना एकसारखा तगादा लावल्यानंतर चालक व वाहकाने अन्य एका बसच्या माध्यमातून त्यांना डेपोपर्यंत नेले. तेथील अधिकाऱ्यांनी दुसरी बस उपलब्ध करून दिल्याने अखेर प्रवासी आपल्या इच्छित स्थळी पोचले. मात्र, रस्त्यात अशा तऱ्हेने बस बंद पडल्यास वाहक व चालक प्रवाशांची जबाबदारी का झटकतात, असा सवाल संबंधित प्रवाशांनी केला. किंबहुना, पीएमपीसारखी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP Bus Close on Road