
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.
‘पीएमपी’ची धाव आता ग्रामीण भागातही
पुणे - एसटी महामंडळाचे (ST Mahamandal) राज्य सरकारमध्ये (State Government) विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप (Strike) सुरू आहे. यामुळे एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे शहराजवळील गावकऱ्यांच्या मागणीनुसार पीएमपीने ग्रामीण भागात (Rural Area) ३४ मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. परिणामी या भागात आता ‘लालपरी’ऐवजी पीएमपीच्या बस (PMP Bus) धावताना दिसत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. एसटी प्रशासनाने कंत्राटी कामगारांमार्फत बससेवा सुरू केली असली तरी ती पुरेशी नाही. त्यामुळे पीएमपी बससेवेची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार पीएमपीने ग्रामीण भागात विविध मार्गांवर बससेवा सुरू केली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर आता एसटी बसऐवजी पीएमपीच्या बस दिसू लागल्या असून प्रवाशांना यामुळे दिलासा मिळत आहे. पीएमपीने भोसरी ते जुन्नर या ७९.३० किलोमीटरच्या मार्गावर बससेवा सुरु केली असून हा सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग आहे. शहरासह सध्या ग्रामीण भागातही बससेवा पोहोचविण्यात येत असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा: पुण्यात अवघ्या ८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
पीएमपीतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बससेवा पुरवली जाते. यासाठी पीएमपीच्या ताफ्यात १ हजार ९५८ बस आहेत. त्यापैकी सुमारे १५२ बस ग्रामीण मार्गांवर धावत आहेत. कोरोनाकाळात पीएमपीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. संसर्ग सुरू झाल्यानंतर टप्पाटप्याने बससेवा सुरु झाली असली, तरी अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मात्र, ग्रामीण भागांतील मार्गांवर सुरु केलेल्या बसमुळे चांगले उत्पन्न मिळत असून जानेवारी महिन्यात ४ कोटी ५२ लाख २७ हजार १८९ रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे. या मार्गांवरील वाहतूक फायद्यात असल्याचे पीएमपी प्रशसनाच्यावतीने सांगण्यात आले.
१,९५८ - पीएमपी ताफ्यातील बस
१५२ - ग्रामीण भागात धावणाऱ्या बस
पीएमपीतर्फे ग्रामीण भागात नवीन मार्ग सुरू केले जात आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने पीएमपी फायद्यात आहे. बहुतांश बस या सीएनजीवर धावणाऱ्या आहेत.
- डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालिका, पीएमपी
Web Title: Pmp Bus In Rural Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..