वाढीव दंड फुकट्यांच्या पथ्यावर!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

दंडाची रक्कम १०० रुपयांवरून ३०० रुपये केल्यामुळे फुकट्या प्रवाशांवरील जरब वाढला आहे; परंतु ही रक्कम कमी करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत तिकीट तपासणी पथकांशी चर्चा करून कारवाईचा आढावा घेऊन अध्यक्षांकडे प्रस्ताव सादर केला जाईल. 
- अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील फुकट्या प्रवाशांवर जरब बसविण्यासाठी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी १०० रुपयांचा दंड तीनशे रुपये केला खरा; पण कारवाई निम्म्याने घटली आहे. तिप्पट दंडामुळे प्रवाशांवर जरब बसल्याचा प्रशासन दावा करीत असले, तरी हा दंड अवाजवी असल्याने वसूल करताना तिकिट तपासनीसांच्या नाकीनऊ येत आहे. ही रक्कम सहजासहजी वसूल होत नसल्याने वाढविलेला दंड फुकट्यांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र आहे.   

पीएमपीमध्ये विनातिकीट प्रवास करताना प्रवासी आढळल्यास ३०० रुपये दंड केला जातो. यापूर्वी तो १०० रुपये  होता. मुंढे यांच्या काळात दंडाची रक्कम वाढविण्यात आली. २०१८ पासून प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. २०१७-१८ मध्ये सुमारे ६२ हजार प्रवाशांवर दंडात्मक कारवाई झाली होती.

तर, २०१८-१९ मध्ये अवघ्या २५ हजार प्रवाशांवर कारवाई झाली आहे. याबाबत विचारणा केली असता, दंडाची रक्कम १०० रुपयांवरून ३०० रुपये केल्यामुळे प्रवाशांवर जरब बसली आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या कमी 
झाली आहे, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. 

फुकटे प्रवासी पकडण्यासाठी पीएमपीची दहा पथके आहेत. प्रत्येक पथकात तीन कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, की फुकट्या प्रवाशांकडून ३०० रुपये दंड वसूल करणे अवघड आहे. त्यामुळे कारवाईवर परिणाम झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP Bus Passenger Fine