इंधन जळतंय, प्रदूषण वाढतंय (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) भोसरी, पिंपरी, चिंचवड व निगडी बस थांब्यांवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी शुक्रवारी (ता. २०) पाहणी केली. सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत एकाच वेळी केलेल्या पाहणीत बहुतांश बस पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ सुरू आढळल्या. त्यामुळे ‘इंधन जळतंय, प्रदूषण वाढतंय’ अशी स्थिती बघायला मिळाली.

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) भोसरी, पिंपरी, चिंचवड व निगडी बस थांब्यांवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी शुक्रवारी (ता. २०) पाहणी केली. सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत एकाच वेळी केलेल्या पाहणीत बहुतांश बस पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ सुरू आढळल्या. त्यामुळे ‘इंधन जळतंय, प्रदूषण वाढतंय’ अशी स्थिती बघायला मिळाली.

लांब पल्ल्याच्या बसच नादुरुस्त
भोसरी -
सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान २४ बसची पाहणी केली. यातील सात सुरू आढळल्या. त्या ठेकेदाराच्या होत्या. मात्र, पीएमपी मालकीच्या सर्व १७ बसचे इंजिन बंद केलेले होते. यात मिडी बससह नवीन आलेल्या सीनजी व चौदा वर्षे जुन्या डिझेल गाड्यांचा समावेश होता. त्यातील पीएमपीने नमूद केलेल्या क्रमांकानुसार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानुसार सुरू आढळलेल्या सर्व बस ठेकेदाराच्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची देखभाल-दुरुस्ती ठेकेदाराकडे आहे. डिझेल किंवा सीएनजी पीएमपीच्या आगारांतून भरले जाते. मात्र, त्याची रक्कम ठेकेदाराच्या मासिक बिलातून वसूल केली जात असल्याचे पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राजगुरुनगर मार्गावर गेलेली एक बस तब्बल २४ मिनिटे आणि हिंजवडी मार्गावरील एक बस १५ मिनिटे सुरू होती. दरम्यान, पीएमपीच्या ताफ्यात आलेली नवीन सीएनजी बस नादुरुस्त झालेली होती. ती घेऊन मॅकेनिकल गेले.

४ - राजगुरुनगर सीएनजी बस
३ - हिंजवडी रेनबो बस

जुनाट गाड्या ओकतात धूर
चिंचवड -
सकाळी सव्वा अकराची वेळ. प्रवासी ताटकळत बसले असताना अचानक पीएमपी बस येते. चालक गाडी बंद न करता बेफिकिरीने ती तशीच चालू स्थितीत ठेवून निघून जातो. अवघ्या तासाभरात अनेक डिझेल गाड्यांबाबत हे चित्र दिसले. पीएमपीच्या ताफ्यात सीएनजी पाठोपाठ नवीन इलेक्‍ट्रिकल बसगाड्या दाखल होऊ लागल्या असतानाही डिझेलवरील जुनाट बसगाड्या अजून धावत आहेत. या गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने बऱ्याच चालकांना स्थानकावर बसचे इंजिन सुरूच ठेवावे लागते. सुमारे १५ ते २० मिनिटे या गाड्या सुरू असतात.

या बसचे इंजिन होते सुरू 
  वारजे माळवाडी (एमएच १४ सीडब्ल्यू १६७४)
  चिंचवड ते मनपा (एमएच-१४ सीडब्ल्यू २१६७)
  मनपा भवन (एमएच १२ एचबी ०१५५)
  भोसरी (एमएच १२ एचबी ०१९३)
  कात्रज (एमएच १४ सीडब्ल्यू २४७२)

प्रवाशांच्या जिवाशी खेळ
पिंपरीगाव -
 पु णे महानगर परिवहन महामंडळाकडून एकीकडे इंधन बचतीचा नारा दिला जातो; परंतु प्रत्यक्षात ठेकेदारांच्या बसचालकांकडून बिनदिक्कतपणे इंधन जाळण्याचे काम सुरू आहे. हे चित्र होते, पिंपरी डेपोतील पिंपरीगाव ‘स्टार्टर पॉइंट’वरचे. मात्र, याकडे डेपो मॅनेजरने सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. परिणामी, इंधन वाया जाण्याबरोबर धुरामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाजवळील बस स्थानकावर दुपारी बारा वाजता चिखली- जाधववाडीमार्गे घरकुल परिसरात जाणाऱ्या दोन बस आल्या. संबंधित वाहनचालक ‘विश्रांती’ घेण्यासाठी गेले, परतले ते तब्बल अर्ध्या तासाने. साडेबारापर्यंत इंधन जळत राहिले आणि दुसरीकडे बसमध्ये शाळेतील लहान मुले, कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला बसल्या होत्या. त्यानंतर पाच मिनिटांनी भोसरीला जाणारी बस पिंपरीगाव बस स्थानकावर आली व वाहनचालक आणि वाहक ती बस तशीच सुरू करून नाश्‍त्यासाठी खाली उतरले. सुमारे बारा वाजून बत्तीस मिनिटांनी ही बस भोसरीकडे मार्गस्थ झाली. या दरम्यानच्या वेळेत बस सुरूच होती. गाड्या चालू ठेवणाऱ्या चालकांवर विनाविलंब कारवाई करू, असे आगार व्यवस्थापक विजय रांजणे यांनी सांगितले.

या बसचे इंधन गेले वाया
    ३०२ भोसरी ते गव्हाणे वस्ती (एमएच १२ क्‍यूजी ३४२१) ही बस चालकाने १२ वाजता इंजिन सुरू करून उभी केली. त्यानंतर तब्बल १२ वाजून ३२ मिनिटांनी सुरू केली.
    ३२६ चिखली मार्गे केएसबी चौक ते जाधववाडी (एमएच १२ एचबी ०४५०) ही १२ वाजता आलेली बस १२ वाजून ३० मिनिटांनी मार्गस्थ झाली. अर्धा तास इंधन वाया.
    ३३४ घरकुल मार्गे हिंजवडीला जाणारी (एमएच १२ एचबी ०१७५) बस १२ वाजता आली आणि १२ वाजून २५ मिनिटांनी वाहन चालकाने सुरू केली.

पाऊणतास बस सुरू; चालक गायब  
निगडी -
 चालकाने मार्गावरून आलेली बस स्थानकात उभी केली, इंजिन बंद न करता गेलेला चालक तब्बल ३५ मिनिटांनी आला अन्‌ पुढच्या फेरीसाठी मार्गस्थ झाला. दरम्यानच्या काळात वाया गेलेल्या इंधनाचे चालकाला कसलेही गांभीर्य नव्हते, हे चित्र होते निगडी, भक्ती-शक्ती चौकातील पीएमपी बस टर्मिनलचे. या टर्मिनलवर शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते साडेबारा या कालावधीत टर्मिनलमध्ये उभ्या असलेल्या अकरा बसची पाहणी केली. यात चार बसचे इंजिन सुरूच होते.

    निगडी ते कात्रज बायपास (एमएच १२ एफसी ३३४५) ही सीएनजी बसचालकाने ११ वाजून ३४ मिनिटांनी टर्मिनलमध्ये उभी केली. इंजिन सुरूच ठेवले. त्यानंतर थेट ११ वाजून ५९ मिनिटांनी आलेल्या चालकाने स्टिअरिंग हाती घेतले.
    निगडी ते कात्रज बायपास ही (एमएच १४, एफसी ३२४६) ११ वाजून ५२ मिनिटांनी आलेली बस १२ वाजून २७ मिनिटांनी मार्गस्थ झाली. या बसचे तब्बल ३५ मिनिटे इंजिन सुरूच होते
    निगडी ते कोथरूड डेपो मार्गावरील (एमएच १२, एचबी ००९१) या क्रमांकाची आणि निगडी ते हिंजवडी या मार्गावरील बसचेही इंजिन सुरू होते.

सध्या सर्व बस सुस्थितीतील आहेत. कोणत्याही बसला धक्का मारावा लागत नाही. त्यामुळे बस उभी केल्यानंतर सुरू ठेवण्याचा प्रश्‍न येत नाही. 
- सतीश गव्हाणे, व्यवस्थापक, भक्ती-शक्ती आगार, निगडी

निखळलेले दरवाजे आणि फुटलेल्या काचा
पिंपरी स्टार्टर पॉइंट -
 डॉ.  बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील बाजूला पीएमपीचा ‘स्टार्टर पॉइंट’ गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे येथे बस थांबत नाहीत. पिंपरी बस थांब्यावर चऱ्होली, रहाटणी,  पिंपरीगाव, नेहरूनगर, वाल्हेकरवाडी, हिंजवडी फेज ३, डांगे चौक या मार्गावर रेनबो बस धावताहेत. परंतु या मार्गावरील बहुतांशी बसच्या समोरील काचा फुटल्या आहेत. ९० टक्के बसचे दरवाजे निखळले असून, नायलॉनच्या दोरीने बांधल्या आहेत. अँगल तुटले आहेत. एखाद्या प्रवाशाने बस पकडण्याच्या नादात दरवाजाला पकडले, तर दरवाजा निखळून हातात येऊन मोठा जीवघेणा अपघात होऊ शकतो. इंडिकेटर नाही. बसवरील मार्गाच्या नावाचा डिस्प्ले गेला आहे. काहींच्या बाजूला नावाची पाटी नाही. त्यामुळे प्रवाशांना नेमक्‍या कोणत्या मार्गाची बस आहे, हेच कळत नाही. या मार्गावरील दोन्ही बाजूकडील बस थांब्यावर वाहन चालक बस थांबत नाहीत. उलट १० ते १५ फूट पुढे बस थांबविली जाते. त्यामुळे प्रवाशांना बसमागे धावावे लागत असल्याचे चित्र आज पाहण्यास मिळाले.

काही नवीन गाड्या येत आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे गाड्या तशाच चालू ठेवाव्या लागत असतील, तर त्या तत्काळ दूर केल्या पाहिजेत. चालक विनाकारण गाडी चालू ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
- अमरेश गवसणे, प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP Bus Start Fuel Loss Pollution Increase