#PMPIssue पीएमपी बस दुरुस्तीनंतरही बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

 पीएमपीच्या ताफ्यात दहा वर्षे उलटून गेलेल्या जुन्या बसची संख्या ४५० पेक्षा जास्त झाली आहे. तरीही या बसची नियमितपणे देखभाल दुरुस्ती होते; परंतु त्यालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. बस बंद ठेवल्या तर, प्रवाशांना सेवा देता येत नाही अन्‌ देखभाल करूनही बस मार्गावर पाठविली तर ती बंद पडते, अशी अवस्था पीएमपीची झाली आहे. 

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात दहा वर्षे उलटून गेलेल्या जुन्या बसची संख्या ४५० पेक्षा जास्त झाली आहे. तरीही या बसची नियमितपणे देखभाल दुरुस्ती होते; परंतु त्यालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. बस बंद ठेवल्या तर, प्रवाशांना सेवा देता येत नाही अन्‌ देखभाल करूनही बस मार्गावर पाठविली तर ती बंद पडते, अशी अवस्था पीएमपीची झाली आहे. 

कात्रज घाटात ब्रेक निकामी झाल्यामुळे बस सोमवारी सायंकाळी खड्ड्यात गेली. गेल्या आठवड्यातही दोन ठिकाणी बसचे ब्रेक निकामी झाले. याबाबत पीएमपीचे प्रशासकीय अधिकारी म्हणाले, ‘‘कात्रजच्या घटनेत चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले का, याबाबत तपासणी सुरू आहे. त्यामुळे त्या बसचे ब्रेक निकामी झाले, असे लगेच म्हणता येणार नाही. गेल्या आठवड्यातील ज्या दोन बसच्या बाबतीत घटना घडली, त्यांचे आयुर्मान पूर्ण झाले आहे.’’ मार्गावर धावणाऱ्या सर्व बसची तीन शिफ्टमध्ये देखभाल दुरुस्ती होत आहे. तसेच आठवड्याला त्या बसची सर्व्हिसिंगही होते. दर १८ हजार किलोमीटरनंतर त्यांची सखोल तपासणी करून दुरुस्ती केली जात आहे. जोपर्यंत आयुर्मान पूर्ण झालेल्या बस ताफ्यातून कमी केल्या जात नाहीत, तोपर्यंत दुरुस्तीवर मर्यादा आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

पीएमपीच्या बसची देखभाल दुरुस्ती हा कळीचा मुद्दा झाला आहे. त्याबाबत अनेकदा प्रशासनासी संपर्क साधला तरी, ठरावीक उत्तरे मिळतात. त्यामुळे बससेवेचा दर्जा खालावत चालला आहे. याकडे कोणाचे लक्ष आहे का?
- संजय शितोळे, प्रवासी 

पीएमपी बसच्या देखभाल दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहे. या बाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. बसचा दर्जा सुधारण्याकडे तातडीने लक्ष द्यावे. 
- रुपेश केसेकर, प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus stop even after repair