वारज्यात बस कोसळून २० जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

बस वेगातच ! 
बसचे स्टिअरिंग तुटल्यामुळे अपघात घडल्याचे चालकाने सांगितले असले, तरी प्रवाशांनी मात्र चालकाने बस भरधाव चालविल्यामुळेच अपघात घडल्याचे सांगितले. दरम्यान, बसचालकाने मद्यपान केले होते का आणि अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची चौकशी करण्यात येणार असल्याचे वारजे पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी स्पष्ट केले.

पुणे - कात्रज आगारातून सोमवारी सकाळी १०.१५ वाजता कात्रज-निगडी बस ३० ते ३५ प्रवाशांना घेऊन पुणे बंगळुरू महामार्गावरून निघाली. १५ मिनिटांत बस सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पूल, मुठा नदीवरील पूल ओलांडून वारजे गावाच्या वेशीजवळ पोचली. वाहक तिकीट देत होता, काही प्रवासी मोबाईलमध्ये व्यस्त होते. कोणाला काही कळायच्या आत अचानक बस महामार्ग सोडून सेवा रस्त्याला डावीकडे वळली, चालकाने स्टिअरिंग डाव्या बाजूला वळविले, त्याच वेळी खाड्‌कन आवाज येऊन बसचे स्टिअरिंग तुटले. २-४ सेकंदांतच बस रस्त्याच्या सीमाभिंतीवरून थेट १०-१५ फूट खाली कोसळली आणि प्रवाशांत एकच गोंधळ उडाला !

आत्तापर्यंत एकही अपघात न केलेले चालक प्रकाश रामभाऊ खोपे (वय ४०, रा. त्रिवेणीनगर, पिंपरी-चिंचवड)  ही बस चालवीत होते.  वारजे जवळ आल्यानंतर प्रवाशांची उतरण्यासाठी घाईगडबड सुरू झाली. त्याच वेळी प्रवाशांना काही कळण्यापूर्वीच बस खाली कोसळली. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. जखमीपैकी १७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कष्टकरी अशांना अपघाताचा फटका बसला. 

झाडांमुळे वाचले जीव
सध्या सेवारस्त्याजवळ बागेचे काम सुरू आहे. त्यातील कामगारांच्या आठ दहा झोपड्या सीमाभिंतीजवळील मोठ्या झाडांच्या आधार घेऊन वसल्या आहेत. बस पहिल्यांदा झाडावर कोसळली, त्यानंतर झोपड्यांवर आदळली. मात्र, सर्व कामगार कामासाठी सकाळी नऊलाच बाहेर गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. केवळ हरिचंद राय (वय ३०, मूळ. रा. दवरीया, भाटराणी, उत्तर प्रदेश) हे पायाला जखम असल्यामुळे झोपडीत आराम करत होते. त्याच वेळी ही घटना घडली. बस व पत्र्याच्या खाली दबले गेल्याने हरिचंद यांना जबर मार लागला. बस झाडांमध्ये अडकल्याने प्रवाशांना तसेच बसखाली झोपडीत अडकलेल्या हरिचंद या मजुराला बाहेर काढणे शक्‍य झाले. ३५ प्रवाशांपैकी काही जणांना किरकोळ मार बसला, तर १८ प्रवासी जखमी झाले. बसच्या ओझ्याने तीन झाडे तुटली. मात्र, या झाडांनीच प्रवासी व मजुरांचे जीव वाचविले.  

मजुरांचा संसार उद्‌ध्वस्त !
नाल्यालगत नव्याने होत असलेल्या बागेचे काम मराठवाडा व उत्तर प्रदेशातील मजूर करत आहेत. बस झोपड्यांवर कोसळली. या वेळी सुरेंदर राय, राजपती राय, विष्णू स्वामी, सोहनलाल हे कामगार जवळच काम करत होते. सुरेंदर राय यांनी  त्यांचे कुटुंबीय नुकतेच गावी पाठविल्याने त्यांच्या झोपडीत कोणी नव्हते. या अपघातामुळे पत्र्याची घरे क्षणार्धात उद्‌ध्वस्त झाली. झोपड्यांमधील मजूर कुटुंबीयांची कपडे, स्टोव्ह, भांडी व अन्य संसारोपयोगी वस्तू तुटलेल्या, विस्कटलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. अपघाताची माहिती कळताच काही कामगारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आपला तुटलेला, विस्कटलेला संसार सावरण्याचा प्रयत्न केला.

बस वेगातच ! 
बसचे स्टिअरिंग तुटल्यामुळे अपघात घडल्याचे चालकाने सांगितले असले, तरी प्रवाशांनी मात्र चालकाने बस भरधाव चालविल्यामुळेच अपघात घडल्याचे सांगितले. दरम्यान, बसचालकाने मद्यपान केले होते का आणि अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची चौकशी करण्यात येणार असल्याचे वारजे पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी स्पष्ट केले.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

Image may contain: one or more people and outdoor

 

Web Title: PMP bus tumbled down in Pune

टॅग्स