'पीएमपी' बसची चाके पेटली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पिंपरी - नाशिक फाट्याजवळील सागर प्लाझा इमारतीसमोर चिखली-पुणे महापालिका मार्गावर धावणाऱ्या "पीएमपी' बसच्या मागील दोन चाकांनी बुधवारी (ता. 23) अचानक पेट घेतला. बसचालकाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांना वेळीच खाली उतरविल्याने पुढील अनर्थ टळला. सागर प्लाझा आणि लांडगे प्लाझामधील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले.

आगीची ही घटना सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. चिखलीतून "पीएमपी' बस 35 प्रवासी घेऊन पुणे पालिकेकडे निघाली होती. सागर प्लाझा इमारतीनजीक ती आली, तेव्हा मागील चाकांना आग लागल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब वाहक आणि चालकाला निदर्शनास आणून दिली. त्यानंतर चालकाने बस रस्त्याकडेला उभी केली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरविले.

प्रत्यक्षदर्शी आणि आग विझविण्यात मोलाची भूमिका बजाविणारे नागेश भाले म्हणाले, ""धूर येऊन चाके अचानक पेटली. माझ्यासह सागर प्लाझा आणि लांडगे प्लाझामधील 7 ते 8 नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सोसायटीमधून बादल्या भरून आणि पाइप आणून पाणी मारले. त्यानंतर आग विझविण्यात यश आले.''

मागच्या चाकांमधील ऑइलची गळती झाली होती. लायनरही गरम झाल्याने चाकांनी पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला.

'पीएमपी' बसमधील अग्निशमन यंत्र रिकामे
पीएमपी बसमध्ये अग्निशमन यंत्र होते. परंतु, ते रिकामे होते. अग्निशमन दलालाही दूरध्वनी करून त्यांच्याकडून मदत मिळविण्यात बराच वेळ गेला. अखेर रस्त्यावरील दुसऱ्या बसमधून अग्निशमन यंत्र मिळवून त्याद्वारे नागरिकांनी आग विझविली. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अग्निशमन दलाला वर्दी मिळून ते घटनास्थळी येईपर्यंत आग जवळपास विझली होती.

Web Title: PMP Bus Tyre Fire