पीएमपीची एकच मध्यवर्ती कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पुणे - पीएमपीची निगडीतील मध्यवर्ती कार्यशाळा (सेंट्रल वर्कशॉप) बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून यापुढे बसच्या इंजिन दुरुस्तीची आणि मोठ्या बिघाडांची दुरुस्ती स्वारगेट कार्यशाळेतच होणार आहे.

पुणे - पीएमपीची निगडीतील मध्यवर्ती कार्यशाळा (सेंट्रल वर्कशॉप) बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून यापुढे बसच्या इंजिन दुरुस्तीची आणि मोठ्या बिघाडांची दुरुस्ती स्वारगेट कार्यशाळेतच होणार आहे.

दुरुस्ती कार्यशाळेत; देखभाल आगारांत
यापूर्वी निगडी आणि स्वारगेट येथे कार्यशाळा होत्या. निगडीतील कार्यशाळेतून बसच्या नोंदणीचेही काम होत असे. त्याची जबाबदारी आता पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील आगारांवर सोपविण्यात आली असून, कार्यशाळेच्या सुमारे ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती आगारांत केली आहे. बसच्या इंजिन दुरुस्तीची आणि मोठ्या बिघाडांची दुरुस्ती स्वारगेट कार्यशाळेत होणार आहे, तर बसची रोजची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी आगारांवर सोपविण्यात आली आहे. ही प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होणार आहे.

१५ दिवसांत ९० गाड्यांची दुरुस्ती
स्वारगेट कार्यशाळेत आता सकाळी आठ ते सायंकाळी साडेचार आणि दुपारी दोन ते रात्री साडेदहा दरम्यान दोन पाळ्यांत कामकाज होईल, असे प्रशासनाने सांगितले. पीएमपीमध्ये कामकाजाच्या सोयीसाठी आणि खर्चात बचत होण्यासाठी एकच मध्यवर्ती कार्यशाळा असावी, असा प्रशासनाचा गेली अनेक वर्षे प्रयत्न होता; परंतु या पूर्वीच्या अध्यक्षांनी त्याबाबत निर्णय घेण्याचे टाळले होते. या पार्श्‍वभूमीवर निगडीची कार्यशाळा बंद झाली आहे. पीएमपीमध्ये बंद बसची संख्या १५ दिवसांपूर्वी ४६० होती. सततच्या प्रयत्नांमुळे ही संख्या आता ३५० झाली आहे.

कर्मचाऱ्यांसाठी नेत्रतपासणी 
पीएमपीच्या १३ आगारांमधील कर्मचाऱ्यांच्या नेत्रतपासणीसाठी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठीच्या उपक्रमाला बुधवारी पुणे स्थानक आगारात प्रारंभ झाला. त्यासाठी कम्युनिटी आय केअर फाउंडेशनने सहकार्य केले आहे. फाउंडेशनच्या डॉ. मनीषा गायकवाड, फरहान इनामदार, प्रांजल मेश्राम, सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल ते १८ मे दरम्यान पुणे स्थानक, १९ ते २२ एप्रिल दरम्यान नरवीर तानाजी वाडी, २४ ते २८ एप्रिल दरम्यान हडपसर, २ ते ५ मे मुख्य इमारत, ८ ते १२ मे आणि १५ ते १९ मे दरम्यान स्वारगेट आगारात तपासणी होणार आहे.

तपासणीदरम्यान आवश्‍यक कर्मचाऱ्यांना वैद्यकीय साह्यही मिळणार आहे.

दिशाभूल केल्यास कारवाई
औद्योगिक न्यायालयाकडून मान्यता घेतलेल्या कामगार संघटनांशी या पुढे संवाद साधण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले. प्रशासनाबाबत कर्मचाऱ्यांची दिशाभूल केल्यास संबंधित संघटनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. पीएमपीएमएल कंपनीबाबत औद्योगिक न्यायालयाकडून मान्यता घेतलेली एकही संघटना सध्या पीएमपीमध्ये अस्तित्वात नाही.

Web Title: pmp central workshop