‘पीएमपी’ बंद; कोंडी सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

हडपसर - सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गात सातत्याने पीएमपी बस बंद पडत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच प्रवाशांना दुसऱ्या बससाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, बस मार्गावर सोडताना ती चांगल्या स्थितीत आहे का, याची तपासणी होते की नाही, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.  

हडपसर - सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्गात सातत्याने पीएमपी बस बंद पडत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच प्रवाशांना दुसऱ्या बससाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, बस मार्गावर सोडताना ती चांगल्या स्थितीत आहे का, याची तपासणी होते की नाही, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.  

गेल्या काही दिवसांपासून बीआरटी मार्गात बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे सातत्याने सोलापूर रस्त्यावर कोंडी होत आहे. बीआरटी मार्गात इतर वाहनेही घुसतात. त्यामुळे हा मार्ग जास्त वर्दळीचा असतो. मार्ग लहान असल्याने बंद पडलेल्या बसमुळे, मागील वाहनांना त्याच ठिकाणी थांबावे लागते. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागते. 

हडपसर परिसरात धावणाऱ्या पीएमपीच्या अनेक बसची दुरवस्था झालेली आहे. अनेक बसची पत्रे निघालेले आहेत. बसायला व्यवस्थित जागा नसते. काचा नसल्यामुळे प्रवाशांचा जोराचा वारा लागत असतो. बस बंद पडल्यामुळे तर आम्हाला कामावर वेळेत जाता येत नाही. याबाबत त्वरित उपाययोजना होणे आवश्‍यक आहे. 
- संजय रावते, प्रवासी

दुरुस्तीऐवजी काढला बसथांबा !  
उंड्री - महंमदवाडीतील देसाई नेत्र रुग्णालयासमोरील बसथांबा काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. या ठिकाणी त्वरित बसथांबा बसवावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणचा बसथांबा मोडकळीस आला होता. त्यामुळे तो बदलण्याची मागणी होत होती. हा बसथांबा काही व्यावसायिकांना अडचणीचा ठरत असल्याने तो काढण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

होळकर वाडी, वडाची वाडीत थांबेच नाहीत दरम्यान, मागील वर्षभरात हडपसर ते होळकर वाडी, हडपसर ते उंड्री-वडाची वाडी या मार्गावर (महापालिकेच्या निधीतून) नवीन बसथांबे बसविण्यात आले. परंतु ते फक्त महापालिकेच्या हद्दीत बसविण्यात आले होते. ग्रामपंचायत हद्दीत बसथांब्यांची अनेक दिवसांपासूनच मागणी आहे. या ठिकाणी पीएमपीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. बस क्रमांक दर्शविणाऱ्या पाट्याही लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना कोणती बस या ठिकाणी येणार ते कळत नाही. तरी त्वरित या ठिकाणी थांबा उभा करावा, अशी मागणी होत आहे. 

प्रवासी म्हणतात... 
अनेक बसचे पत्रे निघालेले
काचा फुटलेल्या, खुर्च्या तुटलेल्या 
बस बंद पडल्याने गैरसोय

Web Title: pmp close, traffic jam