पीएमपी टप्पा वाहतूक सुखदायक

पीएमपी टप्पा वाहतूक सुखदायक

पिंपरी -  पुणे स्टेशन ते राजगुरूनगर सर्वात लांब पन्नास किलोमीटर पल्ल्याचा मार्ग. नेहमी गर्दीचा. बसायला जागा न मिळाल्यास बस सुटण्याच्या ठिकाणापासून इच्छितस्थळी पोचेपर्यंत आसन मिळणे मुश्‍कील. त्यामुळे उभे राहूनच कंटाळवाणा प्रवास. बस ब्रेकडाऊन झाल्यास रद्द होणाऱ्या किलोमीटरमध्ये वाढ. पर्यायाने प्रवाशांचे हाल अन्‌ मनस्ताप. वेळेसह आर्थिक नुकसान. त्यातून मार्ग काढण्यासाठी लांब पल्ल्याचा मार्ग खंडित करून टप्पा वाहतूक सुरू केली. प्रवाशांसाठी ती सुखकारक व फायद्याची ठरत असल्याचे गेल्या चार महिन्यांत दिसून आले आहे. 

पुणे-नाशिक महामार्गासह लगतच्या गावांना जोडण्यासाठी बस सुविधा पुरवून मध्यवर्ती भूमिका बजावणारे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे आगार (पीएमपी) म्हणजे भोसरी. 

आळंदी, वाघोली, महाळूंगे, देहू, पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, बोपखेल, चऱ्होली, निरगुडी आदी गावांना जोडण्यासाठी भोसरीतून बससेवा सुरू आहे. त्यातील सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग म्हणजे राजगुरूनगर (ता. खेड) ते पुणे स्टेशन. त्यासह सर्वच मार्गांचे पाच महिन्यांपूर्वी पीएमपीने परीक्षण केले. कमी उत्पन्नाचे काही मार्ग बंद केले. पुणे स्टेशन ते राजगुरूनगर मार्ग क्रमांक ३५८ भोसरीत खंडित केला व पूर्वीचेच शेड्युल्ड ठेवून भोसरी- राजगुरूनगर आणि भोसरी-पुणे स्टेशन अशी बससेवा सुरू केली. 

याबाबत भोसरी आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे म्हणाले, ‘‘पुणे स्टेशन ते राजगुरूनगर मार्गाचे विभाजन करून दोन टप्पे केले. त्यामुळे पूर्वी दरमहा होणाऱ्या १२३८ खेपांऐवजी आता १३४ खेपांनी वाढ होऊन त्या १३७२ झाल्या आहेत. पूर्वीच्या वीस बसपैकी अकरा बस राजगुरूनगरसाठी व बारा पुणे स्टेशनसाठी सुरू आहेत. शिवाय भोसरी ते चाकण दरम्यान चार बस सुरू आहेत. भोसरीतून राजगुरूनगरसाठी सातव्या मिनिटाला तर, पुणे स्टेशनसाठी बाराव्या मिनिटाला बस सोडली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना बसायला जागा मिळत असून, पीएमपीचे उत्पन्न वाढत आहे. अन्य दिवशी असणारे पावणेदोन लाखांपर्यंतचे उत्पन्न सोमवार व गुरुवारी प्रवाशी संख्या वाढत असल्याने दोन लाखांवर जात आहे.’’ 

पूर्वी राजगुरूनगर, चाकणकडून बस फुल्ल भरून यायची. त्यामुळे बसायला जागा मिळत नव्हती. आताही कधी कधी जागा मिळत नाही. पण, भोसरीतून दुसऱ्या बसमध्ये चढल्यानंतर जागा मिळते. शिवाय बसची संख्या वाढली आहे. बसस्टॅंडवर बसची वाट पहात जास्त वेळ थांबावे लागत नाही, लगेच बस मिळते.
- मिलिंद गिरी, नियमित प्रवासी, मोशी

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com